शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आता काही जम्बो करोना केंद्रे बंद करण्याचा विचार पालिका प्रशासन करीत आहे. या केंद्रावरील होणाऱ्या खर्चामध्येही कपात केली जाणार आहे. तसेच केंद्रे बंद केली तरी अगदी कमी मनुष्यबळामध्ये त्यांचे व्यवस्थापन केले जाणार असल्यामुळे रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा लगेचच कार्यान्वितही करण्याची सुविधा केली जाणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात दैनंदिन नव्याने आढळणाऱ्या रुग्णसंख्येचा आलेख साडेतीनशेच्याही खाली गेला आहे. सध्या मुंबईत ३,४३९ उपचाराधीन रुग्ण आहेत. रुग्णांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात घट झाल्यामुळे मोठय़ा करोना रुग्णालयातील ९६ टक्के खाटा रिक्त आहेत. ऑक्सिजन खाटा सुमारे ९३ टक्के, तर अतिदक्षता विभागातील ८० टक्के खाटा रिक्त आहेत.

मुंबईत सध्या वरळीचे एनएससीआय, मरोळचे सेव्हन हिल्स, गोरेगावचे नेस्को, मुलुंड आणि भायखळय़ाचे रिचर्डसन अ‍ॅण्ड क्रुडास, बीकेसी करोना केंद्र आणि दहिसर ही जम्बो करोना केंद्रे सुरू आहेत. रुग्णालयांमध्ये दाखल असणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे आता मुंबईत सुरू असलेल्या सात जम्बो केंद्रांपैकी काही केंद्रे बंद करण्याचा विचार सध्या पालिका करीत आहे.

रुग्णसंख्या कमी असून तुरळक रुग्ण विखुरलेल्या स्वरूपात जम्बो केंद्रामध्ये दाखल आहेत. त्यामुळे सर्वच केंद्रांमध्ये पायाभूत सुविधांसह मनुष्यबळ इत्यादींचा मोठय़ा प्रमाणात खर्च होत आहे. या खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी आता विभागानुसार किमान एक अशी काही केंद्रे सुरू राहतील. अन्य केंद्रे पूर्णत: बंद राहणार नाहीत.

अगदी कमी मनुष्यबळामध्ये यांचे व्यवस्थापन सुरू ठेवले जाईल, परंतु येथे रुग्ण दाखल केले जाणार नाहीत. रुग्णसंख्या वाढत असल्याची चाहूल लागताच पुन्हा ही केंद्र कार्यान्वित केली जातील. दक्षिण मुंबईत भायखळा किंवा बीकेसी यांपैकी एक केंद्र सुरू राहील, तर पश्चिम उपनगरामध्ये गोरेगाव नेस्को सुरू असेल. पूर्व उपनगरांमध्ये मुलुंडचे करोना केंद्र चालू असेल. याव्यतिरिक्त मरोळचे सेव्हन हिल्स सुरूच राहील, अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

खर्चात कपात करण्यासाठी.. एकीकडे पालिका तिसरी लाट येणार नाही, अशी माहिती उच्च न्यायालयात देते आणि दुसरीकडे जम्बो केंद्रांसाठी खासगी कंपन्यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव सादर करते. यावरून रुग्ण संख्या कमी झालेली असतानाही जम्बो केंद्रांवर केला जाणारा हजारो कोटी रुपयांचा खर्च वाया जात असल्याची चर्चा स्थायी समितीच्या बैठकीत झाली होती. त्यानंतर पालिकेने जम्बो केंद्रावरील खर्चामध्ये कपात करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी पालिकेने नुकतेच रुग्णसंख्येनुसारच केंद्रामधील वॉर्ड सुरू ठेवावेत, अन्य वॉर्ड बंद करण्याच्या सूचनाही केंद्रांना दिलेल्या आहेत.