मुंबई : मुंबई महापालिकेने मुंबईतील सर्व रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचा महाप्रकल्प हाती घेतला आहे. त्याकरीता गेल्या दोन वर्षात महानिविदाही काढण्यात आल्या. मात्र आपल्या परिसरातील रस्ते चांगले असून या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करू नये, अशी मागणी मुंबईतील अनेक रहिवासी संघटनांनी केली आहे. रस्त्यांचे कार्यादेश दिलेले असतानाही रहिवाशांच्या विरोधामुळे ही कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. त्यामुळे पालिकेला आता रस्ते काँक्रीटीकरणाच्या धोरणाबाबत नव्याने विचार करावा लागणार आहे.

मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे सुरू असून या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला परिसरातील नव्या कोऱ्या काँक्रीट रस्त्याला तडे गेले असल्याची घटना डिसेंबर महिन्यात उघडीस आली. त्यानंतर पश्चिम उपनगरातील अनेक ठिकाणी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे आढळून आले होते. त्याचबरोबर स्ते कामांमुळे मुंबईत प्रदूषणही वाढले असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील रहिवाशांनी या काँक्रीटीकरण कामाचा धसका घेतला आहे. मुंबईतील अनेक अंतर्गत रस्ते हे डांबरी आहेत. मात्र या रस्त्यांचेही काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. परंतु, त्याला मुंबईतील उच्चभ्रू परिसरातील रहिवासी संघटनांनी स्पष्ट विरोध केला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनासमोर नवीनच पेच उभा राहिला आहे.

वांद्रे पश्चिमेकडील माऊंट मेरी रस्त्याचे काँक्रीटकरण करण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले होते. मात्र तेथील नागरिकांनी त्याला विरोध केला आहे. मेहबूब स्टुडिओ ते माऊंट मेरी शाळेपर्यंत असलेल्या या मार्गाची अवस्था अतिशय चांगली असल्यामुळे या रस्त्याचे काँक्रीटीकरण करू नये अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. त्यांनी पालिका प्रशासनाला तसे पत्र लिहिले आहे. चांगला रस्ता तोडून तो दुरुस्त करण्याची काहीही गरज नाही. त्यापेक्षा करदात्यांचा पैसा योग्य ठिकाणी वापरावा, असे मत माजी नगरसेवक असिफ झकेरिया यांनी व्यक्त केले आहे.

वांद्या पाठोपाठ मरीन ड्राईव्ह येथील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणालाही रहिवाशांनी विरोध केला आहे. चर्चगेट स्थानकाच्या बाहेर असलेल्या ए, बी, सी व डी या चार अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्याकरीता आलेल्या कंत्राटदाराला येथील रहिवासी संघटनेने विरोध केला. मरीन ड्राईव्ह रहिवासी संघटनेचे अश्विन अगरवाल यांनी सांगितले की, ए, बी, सी, डी हे चारही रस्ते डांबरी असून ते चांगल्या स्थितीत आहेत. त्यामुळे हे रस्ते खोदण्याची काहीही गरज नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच या रस्त्यावर रहिवाशांची वाहने उभी केलेली असतात ती कुठे ठेवणार, काँक्रीटीकरणासाठी रस्ता सहा महिने बंद ठेवावा लागतो मात्र हा रस्ता सहा तासही बंद ठेवला तरी या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होईल, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, अंधेरी पश्चिमेकडील आमदार अमित साटम यांनीही गेल्यावर्षी पालिका आयुक्तांना पत्र लिहून आपल्या विभागातील अंतर्गत रस्ते, गल्ल्या यांचे काँक्रीटीकरण न करता ते डांबरीकरणाने दुरुस्त कराव्या अशी मागणी केली होती. काँक्रीटीकरणासाठी रस्ता खूप महिने बंद ठेवावा लागतो, खर्चही खूप जास्त आहे, रहिवाशांनाही त्रास सोसावा लागतो, या कारणामुळे त्यांनी ही मागणी पत्राद्वारे केली होती. याबाबत पालिकेच्या रस्ते विभागाचे प्रमुख गिरिश निकम यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

मुंबईत रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. पालिका आयुक्तांनी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम बंदी केली. पण रस्ते कामांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर कोणाचेही लक्ष नाही. रस्ते कामांच्या ठिकाणी कोणीही पाणी फवारणी करीत नाही. रस्ता खोदल्यानंतर जलवाहिनी टाकणारे पथक येते, मग कधीतरी गॅसवाहिनी टाकणारे येतात. तोपर्यंत रस्ता तसाच खोदलेला असतो. लोकांच्या पैशांनी लोकांचीच गैरसोय करायची याला काही अर्थ नाही. रस्ते दुरुस्त करा पण ते टप्प्याटप्याने करायला हवेत.
आसिफ झकेरिया , माजी नगरसेवक

Story img Loader