मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू असलेल्या मतदान केंद्रांबाहेर उपस्थित शिवसैनिक (ठाकरे) आणि मनसैनिकांच्या पथकाने, तसेच दक्षिण मुंबईतील मतदान केंद्राबाहेर वावरणाऱ्या अमराठी भाषकाने परिधान केलेले भगवे टी-शर्ट वादग्रस्त ठरले. शिवसैनिक (ठाकरे) आणि मनसैनिकांच्या भगव्या टी-शर्टवर नमूद करण्यात आलेल्या ‘मुंबईत ठाकरेच’, ‘भगवा गार्ड’वरून वादंग झाला. तर दक्षिण मुंबईमधील मतमोजणी केंद्राबाहेर भगवे टी-शर्ट परिधान करून वावरणाऱ्या अमराठी भाषकांची शिवसैनिकांनी धरपकड केली आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. एकूणच मतदानाच्या दिवशी भगवे टी-शर्ट वादग्रस्त ठरले.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत दुबार मतदार, मतदान चोरी अशा घटनांना आळा घालण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना युतीच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तैनात करण्यात आले होते. युतीचे कार्यकर्ते गुरुवारी ‘मुंबईत ठाकरेच’, ‘भगवा गार्ड’ नमूद केलेले टी-शर्ट परिधान करून मतदान केंद्रांबाहेर तैनात होते. परंतु, ही टी-शर्ट परिधान करून मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतराच्या आत थांबू शकत नाही, असा मुद्दा पोलिसांनी उपस्थित केला. परिणामी, दादर, बोरिवली, दहिसर परिसरात भगव्या रंगाचे टी-शर्ट परिधान केलेले शिवसैनिक, मनसैनिक आणि पोलिसांमध्ये शाब्दीक कचमक उडाली.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या वेळी शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचे संयुक्त पथक तैनात करण्यात येणार असून बनावट मतदार ओळखणे, त्यांना मतदान करण्यापासून रोखण्याचे काम शिवसैनिक आणि मनसैनिक करतील, अशी घोषणा शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी मंगळवारी केली होती. या पथकाला ‘भगवे गार्ड’ नाव देण्यात आले होते. यासाठी त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले होते.
त्यानुसार मुंबईतील विविध मतदान केंद्राबाहेर गुरुवारी सकाळपासून सुमारे २ हजार कार्यकर्त्यांचे पथक सक्रिय होते. दादर, बोरिवली भागात मोठ्या संख्येने ‘भगवा गार्ड’ दिसत होते. दुबार मतदार तपासणे, मतदान केंद्राजवळ तपासणी करणे असे प्रकार होत असल्याने मतदान केंद्र परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी कडक भूमिका घेतली.
शिवसेना (ठाकरे) आणि मनसेचे कार्यकर्ते मतदान केंद्राच्या आत किंवा आसपासच्या परिसरात उपस्थित राहू शकत नाहीत. मतदान केंद्रापासून १०० मीटर हद्दीत राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना उपस्थित राहता येणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. यामुळे पोलिस आणि शिवसैनिक, मनसैनिकांमध्ये वाद झाला. पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रापासून दूर जाण्याचे निर्देश दिले. दरम्यान, मतदान केंद्र परिसरात उपस्थित असलेल्या
भाजपचे कार्यकर्त्यांनाही हटवावे अशी मागणी शिवसैनिक-मनसैनिकांनी केली. पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना मतदान केंद्र परिसरातून हटवले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
कांजुर–भांडुप–विक्रोळीमध्येही तणाव
छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा, “मी मराठी” आणि “मराठी माणसा जागा हो…” असे नमूद केलेल्या टी-शर्टमुळे कांजुर – भांडुप – विक्रोळीमध्ये वातावरण तापले होते.
गुरुवारी कांजुर – भांडुप – विक्रोळी या मतदारसंघामध्ये काही मराठी तरुण छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा, “मी मराठी” आणि “मराठी माणसा जागा हो…” अशी घोषवाक्य लिहिलेले टी-शर्ट घालून फिरत होते. यामुळे या भागातील काही पक्षातील नेत्यांनी त्याला विरोध केला. यातून मराठी अस्मिता, मराठी स्वाभिमान आणि मराठी हक्कांची जाणीव जनतेमध्ये निर्माण होत असल्याचे संकेत मिळत आहे. यासंदर्भात महायुतीच्या उमेदवारांनी पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करून हे टी-शर्ट घालू देऊ नका, अशी मागणी यंत्रणांकडे करीत होते. त्याचप्रमाणे काही मतदान केंद्रांवरही निवडणूक अधिकाऱ्यांनी या टी-शर्टला विरोध केल्याच्या घटना घडल्या.
“मी मराठी” किंवा अशा स्वरूपाचे वाक्य नमूद असलेले टी-शर्ट परिधान करण्यास बंदी आहे, असे निवडणूक आयोगाची आचारसंहिता किंवा नियमामध्ये असा उल्लेख नाही. या टी-शर्टवर कोणत्याही पक्षाचे चिन्ह, उमेदवाराचे नाव किंवा प्रचार होईल अशी कोणतीही बाब नाही. असे असतानाही या टी-शर्टला विरोध करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्यासारखे आहे, असे मत यापैकी एका तरुणांनी व्यक्त केले.
दुबार मतदान होऊ नये म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने (ठाकरे) बोरिवलीत तैनात केलेले भगवा गार्ड आणि पोलिसांमध्ये गुरुवारी वाद झाला. दहिसर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ८ मधील मतदान केंद्रावर भाजपाच्या आमदार मनीषा चौधरी पाहणी करण्यासाठी पोहोचल्या असता, तेथे उपस्थित ‘भगवा गार्ड’ने त्यांना विरोध केला. या प्रकारामुळे काही काळ या मतदान केंद्रावर तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
परराज्यातील तरुण पोलिसांच्या स्वाधीन
मुंबईमधील विविध प्रभागांतील मतदान केंद्रांबाहेर शिवसैनिक (ठाकरे) आणि मनसैनिकांचे भगवे गार्ड तैनात असतानाच दक्षिण मुंबईत भगवे टी-शर्ट परिधान केलेले काही अमराठी तरुण संशयास्पदरित्या फिरत असल्याचे शिवसैनिकांच्या निदर्शनास आले. शिवसेनेचे (ठाकरे) दक्षिण मुंबई विभागप्रमुख संतोष शिंदे, शाखा क्रमांक २१८ चे शाखाप्रमुख निलेश (बाळा) अहिरेकर आणि अन्य शिवसैनिकांनी (ठाकरे) यापैकी एका तरुणाला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर अमराठी तरुण अन्य राज्यातून मतदानाच्या दिवशी मुंबईत आला असून त्याच्यासोबत आणखी काही तरुण असल्याचा आरोप संतोष शिंदे यांनी केला. तसेच या तरुणाची सखोल चौकशी करून इतर तरुणांनाही अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.
