मुंबई : महायुतीच्या नगरसेवकांची एकत्र किंवा स्वतंत्र नोंदणी केल्यास स्थायी व अन्य समित्यांवर अधिक प्रतिनिधित्व किंवा फायदा होईल, हे तपासूनच नोंदणीबाबतचा निर्णय घेण्यात येईल. हे शुद्ध राजकारण आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले.
महायुती म्हणून एक-दोन दिवसांत एकत्र नोंदणी करण्यात येईल, असे मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) माजी खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले. फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा झाल्यावर आणि सत्तावाटप झाल्यावरच गट नोंदणीबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी स्पष्ट केले.
निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन आणि महापौरपदाचे आरक्षण निश्चित होऊन काही दिवस उलटले, तरी अजून भाजप आणि शिवसेनेने (शिंदे) विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी केलेली नाही. फडणवीस व शिंदे यांची रविवारी चर्चा अपेक्षित होती. पण त्यांचे दूरध्वनीवरच संभाषण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सत्तावाटपाचे सूत्र ठरल्यावर नोंदणी करायची अशी शिवसेनेची भूमिका असून भाजपने अद्याप त्यादृष्टीने प्रस्ताव दिलेला नाही.
शिवसेनेला सत्तावाटपाचा प्रस्ताव?
साटम यांच्यासह भाजप नेत्यांनी फडणवीस यांच्याशी मंगळवारी चर्चा केली असून शिवसेनेला सत्तावाटपाचा प्रस्ताव देण्यात येणार आहे. भाजपचा प्रस्ताव मान्य नसल्यास आधी पक्षाच्या नावावर नगरसेवकांची स्वतंत्र नोंदणी करायची आणि सत्तावाटप झाल्यावर आघाडीचे पत्र नंतर द्यायचे, अशी भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.
भाजप आणि शिवसेना यांच्यात सत्तावाटपावरून वाद असून त्यामुळे गट नोंद एकत्र करायची की स्वतंत्र, याचा निर्णय झालेला नाही. महायुती म्हणून आघाडीची नोंदणी केल्यास सभागृह नेत्याचा निर्णय किंवा व्हीपनुसार शिंदे गटातील नगरसेवकांना मतदान करावे लागेल किंवा प्रत्येक निर्णयास पाठिंबा द्यावा लागेल. त्यामुळे शिंदे गटाची नोंदणी स्वतंत्र करावी, अशी काही नेत्यांची भूमिका असल्याचे सूत्रांनी नमूद केले.
