मुंबई : महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्यामार्फत १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची देयके पालिकेच्या पोर्टलवर २१ जुलैपासून ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करण्यात आली आहेत. तसेच छापील देयकेही मालमत्ताधारकांना वितरित करण्यात आली आहेत. भूखंड प्रवर्गातील मालमत्ता वगळता इतर सर्व करनिर्धारित मालमत्तांचा या देयकांमध्ये समावेश आहे. देय दिनांकाच्या आत ऑनलाइन पद्धतीने वा विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रांमध्ये कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. विहित मुदतीत मालमत्ता कर भरणा न केल्यास महापालिका अधिनियमातील कलम २०२ अन्वये दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

ग्राहकाची ओळख व माहिती पडताळणी अंतर्गत नोंदणी पूर्ण झालेल्या तसेच अद्याप ‘केवायसी’ नोंदणी न केलेल्या मालमत्ताधारकांसाठीही ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित मालमत्ताधारकांना महानगरपालिकेच्या मालमत्ता कर पोर्टलचा वापर करून मालमत्तेची देय रक्कम तपासून कराचा भरणा करता येणार आहे.

मालमत्ता कराचा ऑनलाइन भरणा कशा पद्धतीने करावा, तसेच ‘केवायसी’ नोंदणी करावयाची असल्यास त्यासाठीची प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती महानगरपालिकेच्या पोर्टलवर उपलब्ध करण्यात आली आहे. करदात्यांना ऑनलाइन सुविधेचा वापर करून घरबसल्या मालमत्ता कराचा भरणा करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ व श्रम वाचतील. या सोबतच एनएफटीई, आरटीजीएस, गुगल पे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे नागरिकांना कर भरणा करता येणार आहे. तसेच, सिटी बँक, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक व बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांचा ‘पेमेंट गेट वे’ निवडू शकतात.

याव्यतिरिक्त ऑफलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधाही उपलब्ध आहे. ज्या मालमत्ताधारकांना मालमत्ता कराचा भरणा ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे, त्यांना महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांतील नागरी सुविधा केंद्रांमध्ये जाऊन धनादेश, धनाकर्ष/ डिमांड ड्राफ्ट, रोख स्वरूपात मालमत्ता कराचा भरणा करता येईल. वेळेत कर भरून नागरिकांनी दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.