मुंबई : मालमत्ताकर थकविणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात महानगरपालिकेने कठोर पावले उचलत जप्ती व लिलाव कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याने एकूण ३४ मालमत्तांना ई – लिलाव प्रक्रियेअंतर्गत दीर्घ मुदतीची नोटीस जारी केली आहे. त्यात मोकळे भूखंड, व्यावसायिक इमारत, हॉटेल आणि संमिश्र वापराच्या मालमत्तांचा समावेश आहे. या ३४ थकबाकीदार आस्थापनांकडे दंड रकमेसह एकूण ५४८ कोटी ६९ लाख ८२ हजार ४८७ रुपये इतकी मोठी थकबाकी प्रलंबित आहे. यापैकी दीर्घ मुदतीच्या नोटीसीची कालमर्यादा संपलेल्या ११ मालमत्तांची प्रत्यक्ष लिलाव प्रक्रिया सुरू करून इच्छुक खरेदीदारांकडून बोली निविदा मागविण्यात आल्या आहेत. लिलाव प्रक्रिया सुरू होताच ५ मालमत्ताधारकांनी १० कोटी ४५ लाख रूपयांचा भरणा केला.

मुंबईतील मालमत्ताधारकांकडून मालमत्ता कराची प्रभावी वसुली करण्यासाठी व्यापक आणि नियोजनबद्ध प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. करदात्यांनी निर्धारित मुदतीत थकीत कराची भरपाई करून दंडात्मक, तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र, सातत्याने नोटीस देऊन व पाठपुरावा करूनही करभरणा करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या मालमत्ताधारकांविरोधात आता महानगरपालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. अशा थकबाकीदारांवर जप्ती व अटकावणीची ठोस आणि निर्णायक कारवाई करण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. कर वसुलीसंदर्भातील नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मालमत्ता लिलावाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मालमत्ता कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या, तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ताकर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना

महानगरपालिकेकडून कलम २०३ अन्वये जप्तीची नोटीस बजावण्यात येत आहेत. विहित मुदतीत कर भरणा न केल्यास मुंबई महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधित मालमत्तेवर जप्ती करून लिलाव केला जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये जर संबंधित मालमत्तेकडून अपेक्षित कर वसूल न झाल्यास मालमलेचा लिलाव करण्यात येईल, असे नोटीसीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

त्यात सी विभागात मेसर्स मीनोचर माणिकशाॅ गांधी व व्ही. डी. शहा यांच्या नावे असलेली संमिश्र मालमत्ता (थकबाकी रक्कम २ कोटी २४ लाख ४३ हजार ९२२ रूपये), एफ दक्षिण विभागात लमण रघुनाथ शेट्टी यांच्या नावे असलेला भूखंड (थकबाकी रक्कम ८९ लाख १५ हजार ९८८ रूपये), एच पश्चिम विभागात भिकाभाई एन उपाध्याय व श्रीराम जे. भट यांच्या नावे असलेली व्यावसायिक मालमत्ता (थकबाकी रक्कम १८ कोटी ८८ लाख १३ हजार ३७६ रूपये), पी उत्तर विभागात बच्चुभाई डब्ल्यू डी शॉ ॲण्ड कंपनी यांच्या नावे असलेले व्यावसायिक शेड (थकबाकी रक्कम ३ कोटी २३ लाख ३ हजार ९३८ रूपये), पी दक्षिण विभागात मेसर्स अमीर पार्क ॲण्ड ॲम्युझमेंट पार्क यांच्या नावे असलेले हॉटेल (थकबाकी रक्कम ३४ कोटी ५५ लाख ६५ हजार ४९९ रूपये), ई विभागात जयंत ऑईल मिल यांच्या नावे असलेली तेल गिरणी व गोदाम (थकबाकी रक्कम १ कोटी ४१ लाख ९१ हजार ०८० रूपये), आर उत्तर विभागात मेसर्स विकयलाल इन्व्हेंस्टमेंट यांच्या नावे असलेला भूखंड (थकबाकी रक्कम २ कोटी ४१ लाख ७९ हजार ३२९ रूपये), डी विभागात सरदार सईदना ताहीर सैफुदीन साहेब यांच्या नावे असलेले रूग्णालय (थकबाकी रक्कम २१ कोटी ३ लाख ३६ हजार ७५२ रूपये), डी विभागात सरदार सईदना ताहीर सैफुदीन साहेब यांच्या नावे असलेली व्यावसायिक मालमत्ता (थकबाकी रक्कम १३ कोटी ४७ लाख ८६ हजार २४५ रूपये), एच पश्चिम विभागात मेसर्स सुमेर असोसिएट्स यांच्या नावे असलेला मोकळा भूखंड (थकबाकी रक्कम १८८ कोटी ४६ लाख २४७ रूपये), एस विभागात मेसर्स राजहंस असोसिएट्स यांच्या नावे असलेली व्यावासायिक मालमत्ता (थकबाकी रक्कम ४७ कोटी २ लाख ९९ हजार ६८७ रूपये), आर दक्षिण विभागात जीवनश्रद्धा कॉ – ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी यांच्या नावे असलेला मोकळा भूखंड (थकबाकी रक्कम ६४ लाख २९ हजार ४६१ रूपये) आणि ई विभागात मेसर्स सुमेर बिल्ट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या नावे असलेला मोकळा भूखंड (थकबाकी रक्कम ८५ कोटी ३८ लाख ७८ हजार १८५ रूपये) आदींचा समावेश आहे.

या सर्व थकबाकीदारांना कर भरणा करण्यासाठी २१ दिवसांची दीर्घ नोटीस बजाविण्यात आली आहे. या मुदतीत कर भरणा न केल्यास विहित कार्यपद्धतीनुसार, लिलाव प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.