लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाने मालमत्ता कर थकविणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून संबंधितांच्या मालमत्तेवर जप्ती आणि लिलाव कारवाई सुरू करण्यात आली आहे. करनिर्धारण आणि संकलन विभागाने गुरुवारी एकूण आठ मालमत्तांवर जप्ती आणि अटकावणीची कारवाई केली.

या मालमत्तांमध्ये मोकळा भूखंड, निवासी भूखंड, व्यावसायिक गाळे, औद्योगिक गाळे, हॉटेल आदींचा समावेश आहे. या आठ थकबाकीदार आस्थापनांकडे मालमत्ता करापोटी दंडाच्या रकमेसह एकूण ४५५ कोटी ४८ लाख ९४ हजार ३७४ रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. थकीत कर भरणा न केल्याने संबंधित ६ मालमत्तांवर जाहीर ई – लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर, २ मालमत्ताधारकांना कर भरणा करण्यासाठी २१ दिवसांची दीर्घ नोटीस बजाविण्यात आली आहे. या मुदतीत कर भरणा न केल्यास लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार, तसेच सहआयुक्त (कर निर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईमधील मालमत्ताधारकांकडून मालमत्ता कराची प्रभावी वसुली करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

करदात्यांनी निर्धारित मुदतीत थकीत कराची भरपाई करून दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र, सातत्याने नोटीस देऊन व पाठपुरावा करूनही करभरणा करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या मालमत्ताधारकांविरोधात आता महानगरपालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. अशा थकबाकीदारांवर जप्ती व अटकावणीची ठोस आणि निर्णायक कारवाई करण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. कर वसुलीसंदर्भातील नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याकामी मालमत्ता लिलावाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने २०२५ – २६ या आर्थिक वर्षात ६ हजार २०० कोटी रूपये कर संकलन उद्दिष्ट निश्चित केले आहे. यापैकी १ एप्रिल २०२५ पासून ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ५,४२६ कोटी ८१ लाख रुपये मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे. तसेच, ३१ मार्च २०२६ अखेर मालमत्ता कर वसुलीच्या दृष्टीने व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ताकर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना महानगरपालिकेकडून कलम २०३ अन्वये जप्तीची नोटीस बजावण्यात येत आहेत. विहित मुदतीत कर भरणा न केल्यास मुंबई महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधित मालमत्तेवर कलम २०३, २०४, २०५, २०६ अन्वये प्रथमतः मालमत्तेतील चीज वस्तू जप्त करून लिलाव केला जाणार आहे.

याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या ई, डी, एफ दक्षिण, एच पश्चिम, पी उत्तर, पी दक्षिण आणि आर उत्तर या प्रशासकीय विभागांमधील थकीत करधारकांच्या मालमत्तांवर अद्ययावत सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम २०६ (२) नुसार, लिलावाची नोटीस जारी करण्यात आली आहे. या आठ मालमत्तांची जाहीर ई लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे.

त्यात गोरेगाव पश्चिम येथील मेसर्स आमीर पार्क ॲण्ड ऍम्युझमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या नावे असलेले हॉटेल (मालमत्तेचे राखीव मूल्य २६८ कोटी १६ लाख ९ हजार ६९१ रूपये), वांद्रे पश्चिम येथील भिकाभाई एन उपाध्याय व एम. जे. भट यांच्या नावे असलेली दुकाने आणि कार्यालये (मालमत्तेचे राखीव मूल्य ५१ कोटी ४२ लाख ९ हजार ९८५ रूपये), दहिसर येथील मेसर्स विकयलाल इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या नावे असलेला निवासी भूखंड (मालमत्तेचे राखीव मूल्य ३४ कोटी ८१ लाख १९ हजार ५२० रूपये), परळ येथील मालमत्तेचे विश्वस्त लक्ष्मण रघुनाथ शेट्ये व गोपाळ पुंडलिक शेट्ये यांच्या नावे मोकळा भूखंड (मालमत्तेचे राखीव मूल्य ३४ कोटी १४ लाख ३० हजार १०१ रूपये), माझगाव येथील मेसर्स जयंत ऑईल मिलची तेल गिरणी, गोदाम आणि कार्यालय (मालमत्तेचे राखीव मूल्य २३ कोटी २० लाख ९७ हजार ८५२ रूपये) आणि मालाड – कुरार गाव येथील बच्चूभाई डासचोव आणि कंपनी मालक यांच्या नावे असेलेले व्यावसायिक वातानुकूलित शेड (मालमत्तेचे राखीव मूल्य ९ कोटी २३ लाख ४ हजार ४९२ रूपये) आदींचा समावेश आहे.

याशिवाय फोर्ट येथील सरदार सय्यदना ताहेर सैफुद्दीन साहेब यांच्या नावे असलेले निवास, व्यावसायिक रूग्णालय (२१ कोटी ३ लाख ३६ हजार ७५२ रूपयांचा मालमत्ताकर थकीत), फोर्ट येथील सरदार सय्यदना ताहेर सैफुद्दीन साहेब यांच्या नावे असेलेल व्यावसायिक गाळे (१३ कोटी ४७ लाख ८६ हजार २४५ रूपयांचा मालमत्ताकर थकीत) यांना कर भरणा करण्यासाठी २१ दिवसांची दीर्घ नोटीस बजाविण्यात आली आहे. या मुदतीत कर न भरल्यास लिलाव प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.