मुंबई : ICU मध्ये रुग्णाच्या डोळ्याजवळ उंदराचा चावा, राजावाडी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार!

मुंबई पालिकेच्या राजावाडी रुग्णालया एका रुग्णाला आयसीयू वॉर्डमध्ये उंदरानं चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

rajawadi hospital
राजावाडी रुग्णालयात उंदरानं रुग्णाला आयसीयूमध्ये चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार

करोनाच्या संकटामुळे राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा स्पष्ट केल्या. मात्र, तरीदेखील अद्याप त्यामध्ये सुधारणा होत नसल्याचंच दिसून येत आहे. याचं ताजं उदाहरण देशाची आर्थिक राजधानी म्हणून मिरवणाऱ्या मुंबईच्या पालिका रुग्णालयातच दिसून आलं. मुंबईतील घाटकोपरमध्ये असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या राजावाडी रुग्णालयामध्ये चक्क ICU मध्ये दाखल असलेल्या एका रुग्णाच्या डोळ्याला उंदरानं चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे आयसीयू, ज्याचा शब्दश: अर्थ ‘अती दक्षता विभाग’ असा आहे, त्याच विभागातील दक्षतेचे वाभाडे निघाले आहेत. या प्रकारावर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडून सारवासारव करण्यात आली असली, तरी मुंबईच्या महापौरांनी मात्र, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.

कारवाईचं महापौरांचं आश्वासन!

घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात आयसीयूमध्ये एक रुग्ण दाखल होता. या रुग्णावर डोळ्यांचेच उपचार केले गेल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, उपचारांनंतर रुग्ण आयसीयूमधील बेडवर झोपला असताना त्याला डोळ्याजवळच उंदरानं चावा घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं आहे. “रुग्णाची परिस्थिती चांगली नाहीये. हा प्रकार घडायला नको होता. आम्ही यासंदर्भाच आवश्यक ती कारवाई करू”, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.

 

कचऱ्यामुळे उंदीर झाल्याचा दावा!

दरम्यान, या सगळ्या प्रकारावर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. विद्या ठाकूर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. “उंदराने रुग्णाच्या डोळ्याला नसून डोळ्याजवळ चावा घेतला आहे. त्याच्या डोळ्याला कोणतीही इजा झालेली नाही. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला, तो वॉर्ड ग्राउंड फ्लोअरला आहे. लोक वारंवार सांगून देखील रुग्णालय परिसरामध्ये कचरा टाकत आहेत. या कचऱ्यामुळेच कदाचित तिथे उंदीर आले असतील”, अशी प्रतिक्रिया विद्या ठाकूर यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली आहे.

 

आयसीयूचे हे हाल, जनरल वॉर्डचं काय?

दरम्यान, या सगळ्या प्रकारावरून काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मुंबई महानगर पालिकेवर टीकास्त्र सोडलं आहे. “रुग्णालयात उंदरांचं साम्राज्य! घाटकोपरमध्ये पालिकेचं एक रुग्णालय आहे राजावाडी. रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये एका उंदरानं उपचार घेत असलेल्या रुग्णाचा डोळा कुरतडून टाकला. आयसीयूमध्ये हे झालं असेल, तर जनरल वॉर्डमध्ये काय होत असेल विचार करा. हे हाल आहेत आशियाच्या सर्वात समृद्ध महानगरपालिकेच्या रुग्णालयातले!” असं ट्वीट संजय निरुपम यांनी केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bmc rajawadi hospital rat bitten patient near eye in icu mayor assure necessary action pmw