गाळ वाहून नेण्याच्या कंत्राटाबाबत नगरसेवकांची नकारघंटा
महापालिकेच्या विभागस्तरावर छोटय़ा नाल्यांच्या सफाईला वेग आला असला तरी उपसलेला गाळ मुंबईबाहेर वाहून नेण्याचे काम कंत्राटदाराला देण्याबाबत नगरसेवकांनी नकारघंटा वाजविल्यामुळे परिस्थिती बिकट बनण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी नाल्याकाठी काढून ठेवलेला गाळ तसाच पडून आहे. हा गाळ वाहून न नेल्यामुळे आणखी गाळ काढून ठेवायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच नाल्यालगत काढून ठेवलेल्या गाळामुळे निर्माण झालेल्या दरुगधीमुळे आसपासचे रहिवाशी हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे नगरसेवक आणि कंत्राटदारांचे संगनमत असल्याचा संशय निर्माण झाला आहे.
नालेसफाई घोटाळा उघडकीस आल्यानंतर सहा कंत्राटदारांविरुद्ध पालिकेने कारवाई केली असून तसेच नालेसफाईची सर्व कंत्राटे पालिका आयुक्त अजय मेहता यांनी रद्द केली. पावसाळा जवळ येताच छोटय़ा नाल्यांच्या सफाईसाठी प्रशासनाने दोन वेळा निविदा काढूनही त्याला प्रतिसाद मिळू शकला नाही. कंत्राटदारांनी संगनमत करुन छोटय़ा नाल्यांच्या निविदांना प्रतिसादच दिला नाही. त्यामुळे कंत्राटदारांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी अजय मेहता यांनी छोटय़ा नाल्यांची सफाई पालिकेच्या विभागस्तरावर करण्याचे आदेश दिले. तसेच नाल्यातून काढण्यात येणाऱ्या गाळाची व्यवस्था करण्याची जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन विभागावर सोपविण्यात आली. परंतु, नगरसेवकांनी हे काम या कंत्राटदाराला मिळू नये यासाठी मोर्चेबांधणी केली आहे.
लहान नाल्यांतून उपसलेला गाळ काठावरच पडून राहिला तर पावसाच्या पाण्याबरोबर तो पुन्हा नाल्यात जाण्याची शक्यता आहे. तसेच गाळाच्या दरुगधीमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तातडीने गाळ वाहून नेण्यासाठी व्यवस्था करण्याची गरज आहे.
रस्त्यालगतचा गाळ वाहून नेणारे कंत्राटदार तो मुंबईबाहेर चार-पाच ठिकाणी संबंधित जमीन मालकाच्या परवानगीने टाकत आहेत. त्याच ठिकाणी छोटय़ा नाल्यांतील गाळ टाकण्यात येणार आहे. पालिकेची अडवणूक करणाऱ्या नालेसफाईतील भ्रष्ट कंत्राटदारांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे, असे पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.