मुंबई: मुंबई महाापालिकेच्या सभागृहात माजी पंतप्रधान आणि भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा बसवण्यास आता जागाच नसल्याचे कारण देत पालिका प्रशासनाने ही मागणी फेटाळली आहे. पालिकेच्या सभागृहातील नगरसेवकांची संख्या वाढली असून नगरसेवकांना बसण्यास जागा पुरत नाही तसेच आधीच सभागृहात असलेले पुतळे व अर्धपुतळे यामुळे जागा व्यापलेली असताना नवीन पुतळ्यासाठी जागा नाही असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आलेली असताना या मागणीचे आता पुढे काय होणार याबाबत उत्सुकता आहे.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा मुंबई महापालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात बसवण्यात यावा अशी मागणी माजी नगरसेविका दक्षा पटेल यांनी २०१८मध्ये केली होती. वाजपेयी हे निष्णात राजकारणी, नि:स्पृह सामाजिक कार्यकर्ता, उत्कृष्ठ वक्ते, कवी, साहित्यिक अशा अनेक गुणांनी संपन्न असे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. या थोर नेत्याची स्मृती म्हणून त्यांचा पुतळा महापालिकेच्या सभागृहात बसवावा अशी मागणी पटेल यांनी केली होती. या मागणीवर पालिका प्रशासनाने असमर्थता दर्शवली आहे. वाजपेयी यांचा पुतळा अन्य समित्यांच्या सभागृहात लावता येईल अशीही सूचना प्रशासनाने केली आहे. याबाबतचा निर्णय आता सत्तेवर असलेल्या भाजपच्या लोकप्रतिनिधींना घ्यावा लागणार आहे.
अन्य मागण्याही फेटाळल्या …
अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा सभागृहात बसवण्यास असमर्थता दर्शवताना प्रशासनाने यापूर्वीच्या अशास्वरुपाच्या मागण्याही फेटाळल्याचा दाखला दिला आहे. त्यात सावित्रीबाई फुले, वि. वा. शिरवाडककर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचे पुतळे बसवण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र जागेवअभावी ही मागणी मान्य केलेली नाही.
सभागृहात यांचे पुतळे
सभागृहात सध्या ज्योतिबा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी, वल्लभभाई पटेल, पंडीत नेहरू, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी अशा तेरा महात्यांचे पुतळे आहेत. तसेच तैलचित्रेही आहेत.
जागा का नाही?
मुंबई महापालिकेचे सभागृह हे पुरातन वास्तू आहे. सभागृहात लाकडी बांधकामातील प्रेक्षक गॅलरी, महत्त्वाच्या व्यक्तींसाठी एक दगडी बांधकामातील गॅलरी यांचा समावेश आहे. तसेच सभागृहाच्या मुख्य जागेत २४७ जणांच्या बैठकीची सोय आहे. त्यात नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व पत्रकारांची बसण्याची व्यवस्था आहे. या जागेत पूर्वी १४० नगरसेवक व नंतर १७० नगरसेवक बसत असत. तेव्हा जागेची कमतरता भासत नव्हती. पत्र आता नगरसेवकांची संख्या २२७ अधिक दहा नामनिर्देशित नगरसेवक यामुळे नगरसेवकांची संख्या २३७ वर गेली आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी व पत्रकार यांना बसण्यासाठी जागाच उरलेली नाही. यावेळीही निवडणूकीनंतर पालिका अस्तित्वात आल्यानंतर नगरसेवकांनाच बसण्यास जागा नसल्याची खूप चर्चा झाली. पहिल्या दिवशी तर काँग्रेसचे नगरसेवक उभेच होते. त्यातच सभागृहात १३ पुतळे बसवण्यात आलेले असून आणखी आसनव्यवस्था करणेही मुश्कील झाले आहे.
