मुंबई : नित्यनियमाने दररोज सकाळी मुंबईत साफसफाईचे काम करणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या एफ – दक्षिण विभागाने टाटा स्मारक रुग्णालयाच्या सहकार्याने मुंबईत विविध ठिकाणी कर्करोग तपासणी आणि जनजागृतीसाठी विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी आणि कामगार दररोज मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे संकलन करणे, रस्त्यांची स्वच्छता करणे, नाले तसेच सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करणे आदी कामे करीत असतात. ही कामे करताना दुर्गंधी, धूळ, आणि आरोग्यास हानिकारक अशा घटकांशी कर्मचाऱ्यांचा संपर्क येतो. काही कर्मचारी, कामगार व्यसनाधीन होतात. या कारणांमुळे त्यांना कर्करोगांसारखे विविध आजार जडतात. यामुळे कर्मचाऱ्याच्या शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक जीवनावर विपरीत परिणाम होतो.

या सर्व बाबींपासून त्यांना परावृत्त करणे आणि त्यांचे आरोग्य सुदृढ रहावे, यासाठी उप आयुक्त (परिमंडळ- २) प्रशांत सपकाळे, एफ दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त वृषाली इंगळे यांच्या पुढाकाराने टाटा स्मारक रुग्णालयाच्या सहकार्याने विशेष कर्करोग तपासणी व जनजागृती आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये टाटा स्मारक रुग्णालयाच्या कर्करोग प्रतिबंध विभागाचे तज्ज्ञ वैद्यकीय मंडळी आणि त्यांच्या पथकांकडून कर्मचाऱ्यांची प्रामुख्याने कर्करोग तपासणी करण्यात आली. तसेच, महिला कामगार यांना स्तनांच्या कर्करोगाची पूर्व अवस्था वेळीच ओळखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या निदानासाठी आधुनिक ‘एचपीव्ही सेल्फ सॅम्पलिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करून कर्करोग तपासणी आणि निदान करण्यात आले. त्यासोबतच तंबाखू, मद्यपान आदी व्यसनांचे दुष्परिणाम समजावून देत, व्यसनापासून दूर राहण्यासाठी तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्यात आले. तसेच, पुढील तपासणीसाठी टाटा स्मारक रुग्णालयाच्या कर्करोग प्रतिबंध विभागात पाठविण्यात आले.