मुंबई : आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील आर्थर रोड परिसरातील सफाई कामगारांच्या वसाहतीचा पुनर्विकास आता मार्गी लागणार आहे. या पुनर्विकासाच्या आड येणाऱ्या चार धार्मिक स्थळांबाबत पालिका प्रशासनाने तोडगा काढला आहे. या वसाहतीच्या पुनर्विकासासाठी १०० वर्षे जुने लक्ष्मीनारायण मंदिर हटवावे लागणार होते. आता या मंदिरासह अन्य तीन धार्मिक स्थळेही वाचण्यात येणार आहेत.
मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागातील सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास मुंबई महापालिका प्रशासन करीत आहे. याअंतर्गत सानेगुरुजी मार्ग अर्थात आर्थर रोड येथील पालिका वसाहतीचाही पुनर्विकास करण्यात येणार आहे. या वसाहतीमध्ये एकूण सफाई कामगारांची २२५ घरे होती. वसाहतीचा पुर्नविकास करून एकूण २५०० सफाई कामगारांसाठी घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे. मात्र हे काम मंदिरांच्या मुद्द्यांमुळे रखडले आहे.
या वसाहतीमध्ये २२५ सेवासदनिकांसह चार धार्मिक स्थळे होती. बुध्द विहार, हनुमान मंदिर, साई बाबा मंदिर व लक्ष्मी नारायण मंदिर अशी चार धार्मिक स्थळे आहेत. वसाहतीचा पुनर्विकास करण्यासाठी ही चारही मंदिरे हटवावी लागणार आहेत. त्याला स्थानिकांचा व वसाहतीतील लोकांचा विरोध होता. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गेल्या आठवड्यात उपायुक्त किरण दिघावकर यांच्या दालनात बैठक पार पडली. सर्व धार्मिक स्थळे याच भूखंडातील एका भागात स्थलांतरित करण्यात येतील व अडीच हजार घरे पूर्ण झाल्यानंतर त्याच इमारतीच्या तळमजल्यावर नव्याने बांधून दिली जातील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान, वसाहतीचा पुनर्विकास होईपर्यंत या २२५ कामगारांना २० हजार रुपये प्रतिमहिना भाडे व पंचाहत्तर हजार रुपये एक रकमी विस्थापन भत्ता देण्याचे ठरले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेला ४५ लाख रुपये प्रति महिना खर्च करावा लागत आहे. हा खर्च वार्षिक ५ कोटी ४० लाख इतका आहे.
चार धार्मिक स्थळांमुळे पुनर्विकासाचे काम रखडले होते. त्यामुळे सफाई कामगारांसाठी अडीच हजार घरे लवकरात लवकर उपलब्ध व्हावी, तसेच तोपर्यंत पालिकेच्या तिजोरीवर प्रतिवर्षी येणारा ५ कोटी ४० लाखांचा भार कमी करण्यासाठी ही मंदिरे लवकरात लवकर स्थलांतरित करण्याचे ठरले. त्यानुसार बुध्द विहार, हनुमान मंदिर, साईबाबा मंदिर स्थलांतरित झाले असून लक्ष्मीनारायण मंदिरही पुढील आठ – दहा दिवसांत स्थलांतरित करण्याचे आदेश यावेळी अधिकाऱ्यांनी दिले.

