मुंबई : महानगरपालिकेचा शिक्षण विभाग आणि खान अकॅडमी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘गणित गुरुवार’ उपक्रमामुळे महानगरपालिकेच्या शाळांच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे. त्याचबरोबर चालू शैक्षणिक वर्षात सुरू करण्यात येणारा ‘सायन्स सोमवार’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केला.

मुंबई महानगरपालिका व खान अकॅडमी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने वरळीतील नेहरू तारांगण येथे मिशन मेरिट आणि स्टेम सुधार उपक्रम या अंतर्गत नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या गुणगौरव समारंभात महापौर बोलत होत्या. ‘मिशन मेरिट आणि स्टेम सुधारणा कार्यक्रम’च्या माध्यमातून महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. ज्या ९३० हून अधिक शाळांमध्ये हा स्टेम कार्यक्रम राबवला गेला, त्या शाळांतील मुले खान अकॅडमीच्या माध्यमातून डिजिटल स्क्रीनवर गणिताचे अवघड प्रश्न चुटकीसरशी सोडवतात. सुमारे सव्वा लाख विद्यार्थी या उपकमामुळे आधुनिक शिक्षण प्रवाहात आले आहेत. तब्बल ३१ हजार विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञान विषयात मिळवलेले अतिरिक्त प्राविण्य हे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे यश असल्याचे तावडे यांनी सांगितले.

‘गणित गुरुवार’ या उपक्रमात दर गुरुवारी रात्री ८ ते १० या वेळेत जेव्हा मुले स्वतःहून मोबाइल किंवा टॅब घेऊन गणिताचा सराव करतात, तेव्हा पालकांनाही अभ्यासाचे महत्त्व पटू लागते. गणितापाठोपाठ आता या शैक्षणिक वर्षापासून ‘सायन्स सोमवार’ हा नवा उपक्रम सुरू होत आहे. ‘गुरुवारी गणिताशी मैत्री, सोमवारी विज्ञानाचा चमत्कार’, असा दुहेरी आनंद आता महानगरपालिकेच्या शाळांतील मुले घेणार आहेत, असे तावडे म्हणाल्या. या उपक्रमामुळे महापालिकेच्या शाळेतून श्रीनिवास रामानुजन, डॉक्टर होमी भाभा किंवा डॉक्टर जयंत नारळीकर यांच्यासारखे व्यक्तिमत्व घडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच १५० गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासासाठी लॅपटॉप देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘गणित गुरुवार’ उपक्रमामुळे महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. शालेय अभ्यास करून ही मुले मोबाइलच्या माध्यमातून गणिताचा सराव करीत आहेत. त्यामुळे उच्च शिक्षणाच्या अनेक वाटा त्यांच्यासाठी खुल्या होणार आहेत, असे मत उपमहापौर संजय घडी यांनी व्यक्त केले. शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांनी ‘गणित गुरुवार, सायन्स सोमवार’प्रमाणे आठवड्याच्या प्रत्येक वाराला वेगळा विषय घ्यावा, असे सुचविले.