मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळू शकणार नाही. मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या २७ शालेय वस्तूंची खरेदी यंदा प्रथमच केंद्र सरकारच्या जेम पोर्टलवरून करण्यात येणार आहे. त्यामुळे यावेळी शालोपयोगी वस्तू शाळेच्या पहिल्या दिवशी मिळण्याची शक्यता कमी आहे. इतर वस्तूंबरोबरच यंदा गणवेशही उशीरा मिळणार आहेत. अद्याप याबाबतचे कार्यादेश दिलेले नाहीत. कार्यादेश दिल्यानंतर ४५ दिवसांत पुरवठा करण्यात येणार असल्यामुळे प्रत्यक्षात जुलै, ऑगस्टमध्ये गणवेश मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेश व इतर शैक्षणिक वस्तूंचा पुरवठा केला जातो. पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना २००७ पासून गणवेश, वह्या, बूट, मोजे, दप्तर, पेन पेन्सिल, तसेच छत्री व रेनकोट आदी २७ वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यानुसार यावेळीही २०२६-२७ आणि २०२७-२८ या दोन वर्षांसाठी मुंबई महापालिकेने मार्च महिन्यात पारंपरिक पद्धतीने निविदा प्रक्रिया सुरू केली होती. परंतु, यावेळी केंद्र सरकारच्या जेम पोर्टलवरून शैक्षणिक साहित्याची खरेदी करण्याचा निर्णय सत्ताधारी महायुतीने घेतल्यामुळे सुरू असलेली निविदा प्रक्रिया पालिका प्रशासनाने रद्द केली.

जेम पोर्टलवरून शैक्षणिक साहित्यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून एकेका वस्तूच्या खरेदीचे प्रस्ताव आता स्थायी समितीसमोर येऊ लागले आहेत. गेल्या आठवड्यात रेनकोट आणि छत्री पुरवठ्याचे प्रस्ताव आल्यानंतर आता या आठवड्यात गणवेश, वह्या आणि स्टेशनरीचे प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी आणले आहेत.

जेम पोर्टलवरून कंत्राटदार निश्चित केल्यानंतर समितीमध्ये आणि सभागृहात या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर कंत्राटदाराला कार्यादेश दिले जातील. कार्यादेश दिल्यापासून ४५ दिवसांत पुरवठादाराने वस्तूंचा पुरवठा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र तोपर्यंत ऑगस्ट महिना उजाडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळू शकणार नाही. दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळावे, असा पालिकेचा प्रयत्न असतो. या वस्तू मिळण्यास उशीर झाला की त्यावरून आतापर्यंत सत्ताधारी शिवसेना (ठाकरे) पक्षावर टीका केली जात होती. मात्र भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्याच वर्षी विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्यास उशीर होणार आहे. शालेय गणवेश दोन संच प्रतिवर्ष व क्रीडा गणवेश एक संच दोन वर्षांतून एकदा दिला जाणार आहे.

जेम पोर्टलवरून शैक्षणिक वस्तूंची खरेदी केल्यामुळे मुंबई महापालिकेचे ३० कोटी रुपये वाचतील असा दावा स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी केला. कोणत्याही प्रकारचा बदल होतो, तेव्हा अशा परिस्थितीला सामोरे जावे लागते, असाही युक्तीवाद त्यांनी केला आहे.

जेम पोर्टल काय ?

जेम पोर्टल अर्थात गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस हे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांसाठी वस्तू आणि सेवा खरेदी करण्याचे राष्ट्रीय सार्वजनिक पोर्टल आहे. याद्वारे व्यावसायिक आणि विक्रेते थेट सरकारला आपले उत्पादन विकू शकतात. मुंबई महापालिकेतील वस्तूंच्या खरेदीतील मध्यस्थाची साखळी मोडीत काढण्यासाठी व या वस्तूंच्या पुरवठादारांमध्ये जागतिक पातळीवरील नामांकित कंत्राटदारांनी सहभागी व्हावे याकरीता हा निर्णय घेण्यात आल्याचे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे.

पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वह्यांसाठी – २१ कोटी १८ लाख १२ हजार ५१२ रुपये

(१९.८५ टक्के दर कमी)

शाळेतील विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी गणवेशाचा पुरवठा – ११८ कोटी ६६ लाख (२.५३ टक्के)

कंपास, पेन्सिल, रबर स्टेशनरी – १८ कोटी ३ लाख