मुंबई : पर्यावरण अध्ययन व प्रशिक्षण सहलीसाठी मुंबई महापालिकेच्या सातवीच्या विद्यार्थ्यांना भाईंदरच्या उत्तन येथील केशवसृष्टी येथे नेण्याचा प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर झाला. केशवसृष्टी ही संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्यामुळे या प्रस्तावाला काँग्रेसने कडाडून विरोध केला. विचारधारेच्या प्रचारासाठी पालिकेच्या करदात्यांचा पैसा वापरू नये, अशी भूमिका काँग्रेसने घेतली. तर दुसरीकडे चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी नेहरू सेंटरला सहल नेण्याच्या प्रस्तावाला विरोध का केला नाही असा सवाल सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे सहलीच्या निमित्ताने मुंबई महापालिकेत विचारधारेचा वाद रंगला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने पालिकेच्या शाळांमधील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय सहलीचे आयोजन केले आहे. भाईंदर येथील केशवसृष्टी या संस्थेत ही सहल काढण्यात येणार आहे. त्यासाठी २ कोटी ४६ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव गुरुवारच्या बैठकीत चर्चेसाठी आला असता काँग्रेसने त्याला विरोध केला. केशवसृष्टी ही संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याने या सहलीच्या प्रस्तावाला विरोधकांनी विरोध केला. तसेच ही सहल रद्द करण्याची मागणी केली. स्थायी समितीच्या बैठकीत विरोधकांनी विरोध केला. मात्र बहुमताच्या जोरावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हा प्रस्ताव मंजूर केला.

केशवसृष्टीला पालिकेचा निधी

याबाबत काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनी सांगितले की, या २.४६ कोटींच्या प्रस्तावासाठी कोणतीही निविदा काढण्यात आलेली नाही. कोणतीही स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया न राबवता सुमारे अडीच कोटी खर्च करण्याचा प्रस्ताव थेट मांडण्यात आला आहे. पालिकेच्या नियमानुसार ३ लाखांच्या मर्यादेपेक्षा जास्त रकमेच्या कामांसाठी सामान्यतः सार्वजनिक जाहिरातीद्वारे निविदा प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. मात्र या नियमाला बगल देण्यात आली आहे. हा अडीच कोटींचा निधी केशवसृष्टीला मिळणार आहे. त्याकरीता ही सहल आयोजित केल्याचा आरोप आजमी यांनी केला.

इतर ठिकाणी सहल आयोजित करावी

इतर संस्थांचे योग्य बाजार सर्वेक्षण किंवा तुलनात्मक मूल्यमापन करण्यात आलेले नाही. मुंबई आणि महाराष्ट्रात पर्यावरण शिक्षण व संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक अनुभवी संस्था आहेत, ज्यामध्ये बीएनएचएस, नेचर पार्क, संजय गांधी उद्यान अशा अनेक संस्था आहेत. त्याचा या सहलीसाठी का विचार का करण्यात आला नाही असा सवाल आजमी यांनी केला.

केशवसृष्टी ही केवळ पर्यावरण क्षेत्रात काम करणारी संस्था नाही. हा परिसर आरएसएसचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीशी संबंधित आहे आणि या संस्थात्मक परिसरात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी सारखी संस्था आहे, जी सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि नेत्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत असते. त्यामुळे पर्यावरण शिक्षणाच्या नावाखाली पालिकेच्या हजारो विद्यार्थ्यांना विशिष्ट वैचारिक आणि सामाजिक-राजकीय संबंध असलेल्या अशा संस्थात्मक परिसरात का घेऊन जात आहे, असा मुद्दा अशरफ यांनी उपस्थित केला.

नेहरू सेंटरच्या प्रस्तावाला विरोध का नाही विरोधकांनी या प्रस्तावाकडे राजकीय चष्म्यातून पाहिले आहे. असाच विद्यार्थ्यांच्या सहलीचा एक प्रस्ताव २८ जुलै रोजी स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला होता. नेहरू विज्ञान सेंटर येथे विद्यार्थ्यांची सहल नेण्याचा तो प्रस्ताव होता. तो प्रस्ताव स्थायी समितीमध्ये एकमताने मंजूर झाला. केशवसृष्टीच्या प्रस्तावामध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पर्यावरणाचे शिक्षण मिळेल.

तसेच या वास्तूत किमान २०० ते २५० एकरमध्ये ज्या पद्धतीने निसर्गाची जपणूक झालेली आहे, वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास किंवा वेगवेगळ्या विषयांची पुस्तके त्या ठिकाणी ठेवलेली आहेत, विद्यार्थ्यांना त्या सगळ्यांचा अभ्यास करता येईल. पण त्या ठिकाणी विरोधकांनी केवळ ”केशवसृष्टी” हे नाव आल्यामुळे राजकीय चष्म्यातून अथवा राजकीय भूमिकेमधून विरोध केला. नेहरू विज्ञान सेंटरच्या प्रस्तावाला आम्ही कोणीही ”नेहरू” हे नाव डोळ्यासमोर ठेवून विरोध केला नाही, असा टोला स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हाणला.