मुंबई : महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना अधिक व्यापक शैक्षणिक संधी उपलब्ध करण्यासाठी खासगी शाळा, शिक्षण संस्था, शिक्षणतज्ज्ञ व विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी महापालिका शाळांशी शैक्षणिक भागीदारी करावी, असे आवाहन कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. त्यामुळे विविध शाळांमधील ज्ञान, अनुभव, कौशल्ये व नाविन्यपूर्ण शैक्षणिक पद्धतींचा फायदा महानगरपालिकेच्या शाळांना मिळेल. जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल, असेही त्यांनी नमूद केले.
शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांशी लोढा यांनी नुकतीच चर्चा केली. त्यात त्यांनी महापालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर दिला.प्रत्येक शाळेकडे काही ना काही वेगळे कौशल्य, अनुभव वा नाविन्यपूर्ण पद्धती असतात. एका शाळेतील शिक्षकांचे तंत्र, शैक्षणिक उपक्रम वा व्यवस्थापन पद्धती अन्य शाळांपर्यंत पोहोचल्यास त्याचा मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे शाळांनी परस्परांचे सामर्थ्य वाढविणारी भागीदारी निर्माण करणे आवश्यक आहे. ही भागीदारी केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित न ठेवता शिक्षकांच्या ज्ञानाची व कौशल्यांची देवाणघेवाण, संयुक्त शैक्षणिक उपक्रम, विषयतज्ज्ञांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधारित कार्यक्रम यावर भर देण्यात यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. महिन्यातून एकदा शिक्षकांच्या भेटी आणि सातत्यपूर्ण संवादातून भागीदारी अधिक प्रभावी करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.
कृत्रिम बुद्धिमत्ता व नव्या तंत्रज्ञानामुळे रोजगाराचे व कामाचे स्वरूप वेगाने बदलत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ परीक्षाभिमुख शिक्षण न देता भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणारे शिक्षण देण्याची गरज आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील आधुनिक कौशल्ये, तंत्रज्ञान व जीवनोपयोगी शिक्षणाची सांगड ‘स्कूल पार्टनरशिप फॉर्म्युला’च्या माध्यमातून शाळांपर्यंत पोहोचवता येईल, असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला.
