तुम्ही पिण्यासाठी पेल्यात घेतलेले पाणी हे सांडपाण्यावर प्रक्रिया करून केलेले आहे असे तुम्हाला समजले तर तुम्ही प्याल का, ते तुमच्या गळी उतरेल का, हे विचारण्याचे कारण असे आहे की भविष्यात कधीतरी असे पाणी पिण्याची मुंबईकरांवर वेळ येऊ शकते. मुंबईची लोकसंख्या वर्षानुवर्षे वाढत असून दुसरीकडे धरणातील पाणीसाठा आता या लोकसंख्येला पुरेनासा झाला आहे. मुंबई महापालिकेने गारगाई धरण प्रकल्प आणि समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्याचा प्रकल्प हाती घेतलेला असला तरी हे प्रकल्प पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे.
पाण्याची मागणी आणि पुरवठा यातील तूटही वाढत जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात पाण्याची ही मागणी पूर्ण करण्यासाठी सांडपाण्याचा पुनर्वापर करावाच लागणार आहे. हा पुनर्वापर पिण्याव्यतिरिक्तच्या कामांसाठी करायचा की पिण्यासाठी करायचा हे मात्र येत्या काळात पावसाचे प्रमाण कसे असेल त्यावर ठरेल. पर्यावरणाचा असाच ऱ्हास होत राहिला आणि अवर्षणाची स्थिती आली तर मात्र प्रक्रिया केलेल सांडपाणीसुद्धा गोड मानून घ्यावे लागले. मात्र त्यापूर्वी नागरिकांना त्याची कल्पना असणे आवश्यक आहे. मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका आहे जिच्या मालकीची मोडकसागर, मध्यवैतरणा, तुलसी, विहार, तानसा ही तब्बल पाच धरणे आहेत.
तर गारगाई हे आणखी एक धरण
बांधले जाणार आहे. मात्र मुंबईची लोकसंख्या गेल्या दहा वर्षात झपाट्याने वाढली आहे. त्या तुलनेत पाणीसाठा वाढलेला नाही. मुंबई महापालिकेचे मध्य वैतरणा धरण २०१४ मध्ये बांधून पूर्ण झाल्यानंतर गेल्या दहा वर्षात एकही नवीन धरण मुंबई महापालिकेने बांधलेले नाही. पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य सरकाने काही वर्षांपूर्वी नेमलेल्या डॉ. एम. ए. चितळे यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार मुंबई पालिकेने गारगाई,पिंजाळ व दमणगंगा असे तीन प्रकल्प हाती घेतले होते. गारगाई धरण प्रकल्पासाठी पाच लाख झाडे कापावी लागणार असल्यामुळे मुंबई महापालिकेने हा प्रकल्प बाजूला ठेवला होता. तर समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवणारा निःक्षारीकरण प्रकल्पही निविदेच्या पातळीवर रखडला होता. आता या दोन्ही प्रकल्पांना गती मिळाली आहे. पण हे दोन्ही प्रकल्प पूर्ण होण्यास किमान चार वर्ष लागणार आहेत.
मुंबईची पाणी पुरवठ्याची भिस्त सध्या तरी धरणातील पाणीसाठ्यावर आहे. एक काळ असा होता की सगळी धरणे कठोकाठ भरली तर मुंबईला वर्षभर पाण्याची चिंता करावी लागत नव्हती. मात्र गेली सलग तीन वर्षे धरणे काठोकाठ भरली तरी मुंबईकरांवर पावसाळ्याच्या आधी पाणी कपात लागू करण्याची वेळ आली आहे. धरणातील पाणीसाठी पुरेनासा झाला आहे.
मुंबई महापालिकेला आता पावसाच्या पाण्यावर अवलंबून न राहता पाण्यासाठी पर्यायी स्रोत उभे करावे लागणार आहेत. त्यातून समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मात्र हा पर्याय खर्चिक आहे. त्यामुळे सांडपाण्याचाच पुनर्वापर करण्याचा विचारही पालिका प्रशासनाच्या पातळीवर सुरू आहे.
घराघरातून आणि कारखान्यातून उत्सर्जित होणारे सांडपाणी व मलजलाचे व्यवस्थापन महापालिकेतर्फे करण्यात येते. सव्वा कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत दररोज साधरणतः दोनशे ते अडीचशे कोटी लीटर सांडपाण्याची निर्मिती होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या पाण्यावर महापालिकेच्या उदंचन केंद्रात प्रक्रिया करण्यात येते. प्रक्रिया केलेल सांडपाणी समुद्र, नदी किंवा खाडीत सोडले जाते. समुद्रात सोडलेले पाणी अधिक चांगल्या दर्जाच असावे याकरीता महापालिकेने मुंबई मलनिस्सारण प्रकल्प हाती घेतला आहे. वरळी, वांद्रे, मालाड, वर्सोवा, धारावी, घाटकोपर आणि भांडुप अशी एकूण सात उदंच केंद्रे येत्या दोन ते तीन वर्षात पूर्ण होतील. हे मलजल प्रक्रिया केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर त्यापैकी ५० टक्के सांडपाण्यावर दुय्यम प्रक्रिया करून समुद्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे समुद्र दूषित होण्याचे प्रमाण कमी होईल. तर दुय्यम प्रक्रिया केलेल्या ५० टक्के पाण्यावर त्रिस्तरीय प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुनर्वापर केला जाणार आहे.
शुद्ध केलेले पाणी
पिण्या व्यतिरिक्त इतर कामांसाठी वापरण्याचा पालिकेचा विचार आहे. त्यामुळे पाण्याची एकंदर मागणी कमी होईल असे नियोजन आहे. मात्र भविष्यात अवर्षणाची स्थिती निर्माण झाल्यास किंवा पाणी कमी पडल्यास त्रिस्तरीय प्रक्रिया केलेल्या पाण्यावर अधिक जलप्रक्रिया करून ते पाणी पिण्यासाठी वापरण्याच्या दृष्टीने पालिकेने अभ्यास अहवाल तयार केला आहे. या पाण्यावर रिव्हर्स ऑस्मॉसिस तसेच क्लोरिनेशनची प्रक्रिया करून हे पाणी पिण्यासाठी वापरता येईल असा विचार आहे.
मात्र तसे झाल्यास त्याला विरोध होण्याची शक्यता आहे. तीन वर्षांपूर्वी कुलाबा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित झाले. तेथे ३५ दशलक्ष लिटर मलजलावर प्रक्रिया होते त्यातील १२ दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेल्या पाण्यावर आणखी प्रक्रिया करून ते पिण्यासाठी वापरले जाण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सल्लागार ही नेमण्यात आला होता. हे पाणी पिण्यायोग्य करता येईल असा अहवाल मिळाल्यामुळे सगळ्याच सांडपाण्याचे पुनर्वापर भविष्यात पिण्याकरीता करण्याच्या दृष्टीने पालिकेने नियोजन सुरू केले आहे. भांडूपच्या जलशुद्धीकरण प्रकल्पात हे पाणी नेण्यासाठी यंत्रणा, जलबोगदे उभारले जाणार आहे. मात्र हे पाणी आपल्या पिण्याच्या पाण्याच्या यंत्रणेत सोडल्यास आणि त्यात कधीतरी त्रुटी राहिल्यास मोठे गंभीर परिणाम होतील अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.
जगामध्ये मलजल शुद्धीकरण करून ते पाणी पिण्यासाठी वापरले जाण्याचा प्रयोग हा फक्त सिंगापूरमध्ये केलेला आहे. या देशात पाण्याची खूपच टंचाई असल्यामुळे तिथे हा प्रकल्प आहे. मात्र आपल्याकडे असा प्रकल्प राबवल्यास ते पाणीही लोकांच्या गळी उतरणार नाही आणि हा विचारही गळी उतरणार नाही. याबाबत पालिकेने अभ्यास अहवाल तयार केलेला असला तरी यामध्ये मुंबईकरांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची गरज आहे.
मुंबईला सध्या ४१०० दशलक्षलीटर पाणी पुरवठा केला जातो. त्यामध्ये सुमारे २७ टक्के पाणी गळती, चोरी होत असते. गळती नासाडी व चोरी थांबवण्यात आली तर ४०० दशलक्ष लिटर पाणी वाचवता येईल. पावसाचे पाणी रस्त्यावर तुंबल्यामुळे त्याचा उपसा करून ते समुद्रात सोडले जाते. दोन धरणे भरून पाण्याचा उपसा पावसाळ्यात केला जातो. मात्र पर्जन्य जल संचय योजना राबवण्यात पालिकेला अपयश आले आहे. त्यामुळे हातचे सोडून पळत्याच्या मागे लागण्याच्या या पालिकेच्या धोरणांमुळे आणि पाण्याचा बेसुमार वापर करणाऱ्या बेफिकीर मुंबईकरांमुळे भविष्यात खरोखरच पाणीपाणी करण्याची वेळ येणार आहे.
