मुंबई महापालिकेच्या शाळांची स्वच्छता, सुरक्षा आणि शाळांमधील विद्युत साधनांच्या देखभालीसह सभोवतालच्या परिसराची स्वच्छता राखण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदारावर पालिका प्रशासन मेहेरबान झाले आहे. या कंत्राटदारांचे कंत्राट मार्च २०१९ मध्ये संपुष्टात आलेले असतानाही त्याला पूर्वी पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. आता सहाव्यांदा आणखी सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. परिणामी कंत्राटदाराच्या पदरात मूळ कंत्राट रकमेपेक्षा १३० कोटी रुपये अधिक पडणार आहेत.

शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांत पालिकेच्या ३३८ शाळांच्या इमारतींची स्वच्छता, सुरक्षा यांसाठी २०१६-१९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी या कंत्राटदाराला तीन वर्षांकरिता २०९ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. हे कंत्राट मार्च २०१९ ला संपुष्टात आले. मात्र प्रशासनाने आतापर्यंत कंत्राटदाराला सहा महिन्यांची पाच वेळा मुदतवाढ दिली आहे. निविदा प्रक्रिया सुरू असल्याची सबब पुढे करीत प्रशासनाने ही मुदतवाढ दिली होती. आता या कंत्राटदाराला ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यासाठी प्रशासनाने स्थायी समितीकडे प्रस्ताव पाठवला आहे. अडीच वर्षे मुदतवाढ दिल्यामुळे मूळ कंत्राटाच्या रकमेत १३० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या प्रस्तावावर येत्या स्थायी समितीच्या बैठकीत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

टाळेबंदीतही कोट्यवधींची उधळण

टाळेबंदीच्या काळात शाळा बंद असतानाही या कंत्राटदारावर कोट्यवधींची उधळण केल्याचे आढळून आले आहे. काही शाळांमध्ये विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र या कालावधीत शाळांच्या सफाईसाठी विविध संस्थांची नेमणूक करण्यात आली होती, तरीही या कालावधीसाठी या कंत्राटदाराला ३० ते ३५ कोटी देण्यात आल्याबद्दल सदस्यांनी आक्षेप घेतले होते. मात्र टाळेबंदीच्या काळात कंत्राटदाराकडून जेवढ्या सेवा घेतल्या तेवढेच अधिदान केल्यामुळे या काळातील खर्च ३६८ कोटी रुपयांवरून ३३७ कोटी रुपयांवर आला असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.