मुंबई : श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपने ज्येष्ठ व अनुभवी नगरसेवक प्रभाकर शिंदे यांना, तर शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी अनुभवी नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांना संधी दिली. या दोन नगरसेवकांनी बुधवारी महापालिकेच्या चिटणीस विभागाकडे आपले अर्ज सादर केले. या दोघांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेसाठी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्यानंतर वैधानिक समित्या कोणाकडे जाणार आणि वैधानिक समित्यांवर कोण अध्यक्ष होणार याबाबतची उत्सुकता होती. स्थायी, शिक्षण, बेस्ट आणि सुधार या मुंबई महापालिकेच्या चार वैधानिक समित्या असून या समित्यांसाठी सदस्यांची घोषणा सोमवारी पालिका सभागृहात महापौर रितू तावडे यांनी केली. यापैकी शिक्षण व स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवार, २० फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. तर बेस्ट आणि सुधार समितीची निवडणूक २३ फेब्रुवारीला होणार आहे. या चारही समित्यांसाठी बुधवार, १८ फेब्रुवारी रोजी अर्ज भरण्याची मुदत होती. त्यानुसार सकाळी भाजपकडून स्थायी समितीसाठी प्रभाकर शिंदे, तर शिक्षण समितीसाठी राजेश्री शिरवडकर यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले. तर सुधार आणि बेस्ट समिती शिवसेना (शिंदे) पक्षाला दिल्या जाणार असून त्यांनाही आजच अर्ज सादर करावे लागणार आहेत.
मकरंद नार्वेकर, प्रकाश दरेकर यांना अध्यक्षपदाची हुलकावणी
स्थायी समितीवर एकूण २६ सदस्य असून मुंबई महापालिकेत भाजपला बहुमत असल्यामुळे भाजपला सर्वाधिक दहा सदस्य स्थायी समितीवर पाठवता आले आहेत. या दहा सदस्यांमध्ये मकरंद नार्वेकर, प्रकाश दरेकर आणि प्रभाकर शिंदे हे अनुभवी नगरसेवक होते. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी त्यांची नावे चर्चेत होती. त्यातही प्रभाकर शिंदे यांचे नाव आघाडीवर होते. शिंदे यांच्या नावावर भाजपने शिक्कामोर्तब केले आहे. स्थायी समितीवर भाजपने सभागृह नेते गणेश खणकर, राखी जाधव, हरीश भांदिर्गे, शिवकुमार झा, शीतल गंभीर, प्रीती साटम, तेजिंदर तिवाना यांनाही संधी दिली आहे.
शिक्षण समिती अध्यक्षपदी राजेश्री शिरवडकर
मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीवर २२ सदस्य असून त्यापैकी चार सदस्य नामनिर्देशित असतात. बहुमतामुळे भाजपने या समितीवर ११ सदस्य पाठवले आहेत. भाजपने शिक्षण समितीवर राजेश्री शिरवडकर, स्वप्ना म्हात्रे, सुषम सावंत, शिवानंद शेट्टी, योगिता कोळी, डॉ. नील सोमय्या, रोहन राठोड, श्रीकला पिल्ले, विक्रम राजपूत, निखिल किशोर व्यास, योजना ठोकळे यांना पाठवले आहे. यामध्ये राजेश्री शिरवडकर आणि डॉ. नील सोमय्या हे अनुभवी नगरसेवक आहेत. मात्र शिरवडकर यांचे नाव महापौर पदाच्या शर्यतीतही होते. परंतु, त्यांना महापौर पद न मिळाल्यामुळे शिक्षण समिती अध्यक्ष पद देण्यात आले आहे.
