मुंबई : संख्याबळाअभावी स्थायी समितीमध्ये अनेक प्रस्ताव मागे ठेवण्याची नामुष्की गेल्या आठवड्यात सत्ताधारी महायुतीवर ओढवली होती. त्यानंतर गुरुवारी झालेल्या बैठकीत एका नगरसेवकाला अक्षरशः रुग्णालयातून बोलवून आणण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली. प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी संख्याबळ वाढवण्याकरीता भाजपचे नगरसेवक शिवकुमार झा हे रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन थेट स्थायी समितीच्या बैठकीत शाल गुंडाळून आले होते. त्यांच्या उपस्थितीमुळे सभागृहात वेगळीच चर्चा सुरू झाली.

महासभेत दोनदा संख्याबळाअभावी प्रस्ताव राखून ठेवण्याची वेळ सत्ताधारी भाजपवर आल्यानंतर स्थायी समितीमध्येही गेल्या गुरुवारी तशीच वेळ आली. अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रसंगावधान राखत प्रस्तावांवरील निर्णय राखून ठेवले होते. मात्र, हे सगळे प्रस्ताव ३० जुलैच्या बैठकीत मंजूर करणे आवश्यक होते. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्षापेक्षा जास्त संख्याबळ सभागृहात राखणे आवश्यक होते. स्थायी समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत सत्ताधारी पक्षाचे बहुमत कायम ठेवण्यासाठी एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले.

सत्ताधारी महायुतीचे तीन सदस्य अनुपस्थित राहिल्याने महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करताना संख्याबळ कमी पडत होते. शिवसेना (शिंदे) पक्षाच्या यामिनी जाधव या आजारी असून रुग्णालयात आहेत. तर भाजपचे शिवकुमार झा हे देखील रुग्णालयात होते. राखी जाधव या रजेवर होत्या. सत्ताधारी पक्षाचे तीन सदस्य नसल्यामुळे त्यांचे संख्याबळ १० होते. परंतु, बैठक अर्धी पार पडल्यानंतर राखी जाधव या हजर झाल्या. तर थोड्या वेळाने शिवकुमार झा हे देखील शाल गुंडाळून आले. तर बैठक संपेपर्यंत सत्ताधारी पक्षाचे सगळे नगरसेवक एकाच जागेवर बसून होते. चारकोप-कांदिवली मतदारसंघाचे भाजप नगरसेवक शिवकुमार गेल्या आठवडाभरापासून रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, त्यांना कोणत्याही परिस्थितीत बैठकीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज घेत थेट पालिका मुख्यालय गाठले.

भागलपुरी शाल, कानांना रुमाल….

बैठकीदरम्यान शिवकुमार झा यांना ताप आणि थंडीचा त्रास होत होता. त्यांनी अंगावर भागलपुरी शाल घेतली होती आणि कानांना रुमाल बांधला होता. प्रकृती अस्वस्थ असूनही ते बैठकीत उपस्थित राहिले आणि जीएसटीशी संबंधित महत्त्वाच्या प्रस्तावावरील मतदानातही सहभागी झाले. बैठक संपण्याच्या काही मिनिटांपूर्वी शिवकुमार झा यांना परत जाण्याची परवानगी देण्यात आली.

सत्ताधारी संपूर्ण बैठकीत एका जागेवरच… स्थायी समितीमध्ये एकूण २६ सदस्य असून त्यात शिवसेना(ठाकरे), काँग्रेस, मनसे, एमआयएम या विरोधी पक्षांचे १२ तर सत्ताधारी शिवसेना (शिंदे) आणि भाजपचे १३ सदस्य आहेत. संख्याबळात केवळ एकचा फरक असल्यामुळे स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर करताना सत्ताधारी पक्षाला नेहमी संख्याबळाचे भान ठेवावे लागते. त्यामुळे बैठक संपेपर्यंत सत्ताधारी पक्षाच्या सगळ्या नगरसेवकांना एकाच जागेवर बसून राहावे लागते