मुंबई : मुंबईतील लसीकरणाचा वेग गेल्या काही दिवसांपासून मंदावलेला असल्यामुळे लसीकरणाला गती देण्यासाठी पालिकेची यंत्रणा आता सोसायटय़ा आणि झोपडपट्टय़ांमध्ये पोहोचणार आहे. रुग्णवाहिका आणि फिरत्या लसीकरण केंद्रांद्वारे नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

दोन मात्रा घेतलेल्यांसाठी सर्व निर्बंध शिथिल केल्यानंतर नागरिकांचा लसीकरणाकडे ओघ वाढला होता. मात्र आता पुन्हा एकदा लसीकरण केंद्रांवरील गर्दी ओसरू लागली आहे. लसीकरण १०० टक्के झालेले नाही. लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी पालिका आता स्वत:च लोकांपर्यंत पोहोचणार आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी याबाबत माहिती दिली की, प्रत्येक लसीकरण केंद्राबरोबर काही ठरावीक सोसायटय़ा व झोपडपट्टय़ा जोडलेल्या आहेत. त्यामुळे या केंद्रातील पथकांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  प्रत्येक विभाग कार्यालयांतर्गत १० ते १२ रुग्णवाहिका आहेत. या रुग्णवाहिकांमधून ही पथके सोसायटय़ांच्या दारी जाऊन सर्वाचे लसीकरण झाले आहे की नाही याची माहिती घेतील. तसेच लसीकरण केंद्रापासून काही सोसायटय़ा किंवा वस्त्या लांब असतील तर त्यांच्या जवळ एखाद्या समाजमंदिरात किंवा सभागृहात शिबीर आयोजित करून लसीकरण केले जाणार आहे. याच दरम्यान कोणी लस घेतली नसेल तर का घेतली नाही याची माहिती घेऊन त्यांचे मन वळवण्याचा, त्यांच्या मनातील भीती घालवण्याचा प्रयत्नही केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या सोसायटय़ांचे १०० टक्के लसीकरण झाले आहे अशा सोसायटय़ांच्या दर्शनी भागात तसा फलक पालिकेतर्फे लावला जात आहे. त्याकरिता सोसायटय़ांच्या पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जात आहे. असा फलक लावण्याच्या मोहिमेमुळे कोणी लस घेतली नसेल तर त्यांची माहिती पुढे येण्यास मदत होत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

अंधेरीमध्ये के पश्चिम विभाग कार्यालयाने बेस्टच्या एसी मिनी बसमध्ये फिरते लसीकरण केंद्र तयार केले आहे. यात डॉक्टर, नर्स, पालिका कर्मचारी, तसेच लसीकरणासाठी लागणारी यंत्रणा आहे. जुहू चौपाटी, प्रार्थना स्थळे, मार्केट, सोसायटय़ा अशा ठिकाणी जाऊन ही बस नागरिकांचे लसीकरण झाले की नाही हे तपासून त्यांचे लसीकरण करून देत असल्याची माहिती के पश्चिम विभागाचे साहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चौहान यांनी दिली.

आतापर्यंत मुंबईतील लसीकरणास पात्र असलेल्या नागरिकांपैकी ९७ टक्के लोकांनी लशीची किमान एक मात्रा घेतली आहे. तर ५५ टक्के नागरिकांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी दिली.

मुलांच्या लसीकरणासाठी कृती आराखडा 

लवकरच बालकांच्या लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता  असल्याने पालिकेने तयारी सुरू केली आहे. साडेतीनशे केंद्रामार्फत आणि प्रसूतिगृहांमार्फत हे  लसीकरण केले जाणार आहे. २ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी परवानगी देण्याची शिफारस तज्ज्ञ समितीने औषध महानियंत्रकांकडे केली आहे. या पाश्र्वभूमीवर पालिकेने कृती आराखडा तयार केला आहे.  प्रसूतिगृहे, उपनगरी रुग्णालये, नर्सिग होम आणि ३५० लसीकरण केंद्रांवर हे लसीकरण केले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. मुंबईत साधारण ३० लाख मुले आहेत. त्यामुळे लस साठवणुकीसाठी  शीतगृहांचाही आढावा घेण्यात आला आहे. सध्याच्या केंद्रापैकी काही केंद्रे मुलांसाठी राखीव ठेवता येतील का किंवा मोठय़ा केंद्रावरील काही बूथ मुलांसाठी राखीव ठेवता येतील का याची चाचपणी  आहे.