मुंबई : प्रारूप मतदार यादीतील लेखनिकांच्या काही चुका, दुसऱ्या प्रभागातील अंतर्भूत झालेले मतदार, दुबार नावे पडताळणी आदी विविध समस्यांच्या निराकरणासाठी निवडणूक कर्तव्यावर असलेले महानगरपालिकेचे कर्मचारी मतदारांच्या घरोघरी जाणार आहेत. मुंबईतील वसाहती, गृहनिर्माण संकुले, इमारतीतील मतदारांना १ डिसेंबरपासून कर्मचारी भेटी देऊन त्यांच्याशी संवाद साधतील.

मतदार यादीमध्ये एकापेक्षा अधिकवेळा असलेल्या नावांसमोर ‘**’ (दोन तारे) अशी खूण करुन प्रभाग प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, प्रारुप यादीतील एकापेक्षा अधिकवेळा असलेल्या दुबार (समान) नावांबाबत तपासणी करुन ती खरोखरच एकाच व्यक्तीची आहे किंवा वेगळ्या, यासाठी मतदाराचे नाव, लिंग, पत्ता व छायाचित्र यांची प्राथमिक तपासणी केली जाईल. त्यात साम्य आढळल्यास संबंधित मतदाराशी संपर्क साधून आवश्यक माहिती घेतली जाणार आहे.

संबंधित मतदार प्रत्यक्षात एकच व्यक्ती असल्याची खात्री पटल्यानंतर ते नेमक्या कोणत्या केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांच्याकडून विहित नमुन्यात अर्ज घेऊन संबंधितास इच्छेप्रमाणे मतदान करण्यासाठी प्रभागातील मतदान केंद्र निश्चित करुन देण्यात येणार आहे. संबंधित मतदारांच्या घरी, गृहनिर्माण संस्थांमध्ये येणारे निवडणूक कामकाजविषयक कर्मचारी – अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संबंधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असूनही महापालिकेच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीतून नावे वगळण्यात आली असल्यास संबंधितांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, प्रारूप मतदार यादीतील लेखनिकांच्या काही चुका, दुसऱ्या प्रभागातील अंतर्भूत झालेले मतदार, दुबार नावे पडताळणी पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून केली जातील.