मुंबई : मुंबई महापालिकेच्या चार वैधानिक समित्यांपैकी बेस्ट आणि सुधार या दोन समित्यांचे अध्यक्षपद शिवसेना (शिंदे) पक्षाला देण्यात आले आहे. सुधार समितीसाठी शिवसेना (शिंदे) पक्षाच्या मागाठाणेमधील नगरसेविका संध्या दोषी यांना, तर बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी वडाळामधील नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांना संधी देण्यात आली आहे. या दोन्ही नगरसेविकांनी बुधवारी आपले अध्यक्षपदासाठीचे उमेदवारी अर्ज चिटणीस विभागाकडे भरले.

मुंबई महापालिकेसाठी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुका गेल्या आठवड्यात पार पडल्यानंतर वैधानिक समित्या कोणाकडे जाणार आणि वैधानिक समित्यांवर कोण अध्यक्ष होणार याबाबतची उत्सुकता होती. स्थायी, शिक्षण, बेस्ट आणि सुधार या मुंबई महापालिकेच्या चार वैधानिक समित्या असून या समित्यांसाठी सदस्यांची घोषणा सोमवारी पालिका सभागृहात महापौर रितू तावडे यांनी केली. यापैकी शिक्षण व स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी येत्या शुक्रवारी २० फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. तर बेस्ट आणि सुधार समितीची निवडणूक २३ फेब्रुवारीला होणार आहे. या चारही समित्यांसाठी बुधवारी १८ फेब्रुवारी रोजी अर्ज भरण्याची मुदत होती. त्यानुसार सकाळी भाजपकडून स्थायी समितीसाठी प्रभाकर शिंदे, तर शिक्षण समितीसाठी राजेश्री शिरवडकर यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले. तर सुधार आणि बेस्ट समितीचे अध्यक्षपद शिवसेना (शिंदे) पक्षाला देण्याचे ठरले असून सुधार समितीसाठी नगरसेविका संध्या दोषी यांनी, तर बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी बुधवारी आपले उमेदवारी अर्ज भरले.

भूखंडासंबंधी निर्णयासाठी सुधार समिती महत्त्वाची…

स्थायी समितीप्रमाणेच सुधार समिती ही देखाल एक महत्त्वाची समिती आहे. या समितीमध्ये मुंबई महापालिकेच्या मालकीचे भूखंड, इमारती अशा मालमत्तांसंबंधीचे निर्णय घेतले जातात. सुधार समितीवर एकूण २६ सदस्य असतात. मुंबई महापालिकेत बहुमत असल्यामुळे भाजपला सर्वाधिक दहा सदस्य पाठवता आले. या दहा सदस्यांमध्ये भाजपच्या अलका केरकर, प्रकाश गंगाधरे, तेजस्वी घोसाळकर, दीपक तावडे, साक्षी दळवी, संदीप पटेल, अनिष मकवानी, स्वप्ना म्हात्रे, चंदन शर्मा, महादेव शिवगण यांचा समावेश आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाकडून अमेय घोले, संध्या दोषी, अजित रावराणे, किरण लांडगे यांना सुधार समितीवर पाठवण्यात आले आहे. तर शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या विशाखा राऊत, मिलिंद वैद्य, सचिन पडवळ, उर्मिला पांचाळ, लोना रावत, विठ्ठल लोकरे, जितेंद्र वळवी यांना सदस्यत्व देण्यात आले आहे.

बेस्ट समिती आव्हानात्मक

बेस्ट उपक्रमाची गेल्या काही वर्षात अतिशय दूरवस्था झाली आहे. बेस्ट उपक्रमावर सुमारे तीन हजार कोटींची तूट आहे. तर संचित तूट सुमारे आठ हजार कोटींपर्यंत गेली आहे. त्यामुळे बेस्टच्या अध्यक्षपदावरील नगरसेवकाला बेस्ट उपक्रमाला तोट्यातून बाहेर काढणे, कामगारांचे प्रश्न सोडवणे अशी मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. बेस्ट समितीवर भाजपकडून आकाश पुरोहित, सुनील गणाचार्य, संतोष मेढेकर, अजय सिंग, प्रमोद वाकोडे, रमाकांत गुप्ता यांना सदस्य म्हणून पाठवण्यात आले आहे. तर शिवसेना (शिंदे) पक्षाने तृष्णा विश्वासराव, उपेंद्र सावंत यांना संधी दिली आहे. तर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रवीणा मोरजकर, सुनील आहिर, नितीन नांदगावकर, सचिन पाटील आणि काँग्रेसच्या आशा कोपरकर बेस्ट समितीवर असतील.