मुंबई : मुंबई महापालिकेच्या शिक्षण, स्थायी, सुधार आणि बेस्ट या चार वैधानिक समित्यांवर विविध राजकीय पक्षांनी ज्येष्ठ नगरसेवकांना संधी दिली आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाने पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षात प्रवेश केलेल्यांना समिती सदस्यत्व देऊन बक्षीस दिले आहे. निवडणुकीच्या आधीच भाजपमध्ये गेलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना सुधार समितीवर तर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या राखी जाधव यांना स्थायी समितीवर पाठवण्यात आले आहे. महापौर पदाने हुलकावणी दिलेल्या राजेश्री शिरवडकर यांना शिक्षण समितीवर पाठवण्यात आले आहे. तर शिक्षण आणि बेस्ट समितीवर नामनिर्देशित नगरसेवक पाठवून बिगर नगरसेवकांचेही पुनर्वसन करण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेच्या चार वैधानिक समित्यांवर सदस्यांच्या नेमणूकीसाठी सोमवारी विशेष सभा बोलवण्यात आली होती. या सभेत राजकीय पक्षांनी सदस्यत्वासाठी दिलेल्या नावांची घोषणा महापौर रितू तावडे यांनी सभागृहात केली. राजकीय पक्षांकडून बंद लखोट्यात आलेली नावे यावेळी त्यांनी वाचून दाखवली. अनुभवी नगरसेवकांबरोबरच बाहेरून आलेल्या नगरसेवकांना आणि नेत्यांच्या नातेवाईकांना या समित्यांवर सर्वच पक्षांनी स्थान दिले आहे.
नातेवाईकांना संधी …..
निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेल्या तेजस्वी घोसाळकर आणि राखी जाधव या दोन ज्येष्ठ नगरसेविकांना स्थायी आणि सुधार समितीवर संधी दिली आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांचे बंधू असलेले मकरंद नार्वेकर, आमदार प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर यांना स्थायी समितीवर पाठवण्यात आले आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले चंदन शर्मा यांना सुधार समितीवर पाठवले आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते आमदार सुनील प्रभू यांचे पुत्र नगरसेवक अंकित प्रभू यांना शिक्षण समितीवर पाठवण्यात आले आहे.
बेस्ट समितीवर सर्वाधिक नामनिर्देशित नगरसेवकांचा भरणा असून त्यात सर्वच राजकीय पक्षांनी आपल्याला हवे ते सदस्य पाठवले आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षाने बेस्ट समितीवर आमदार सचिन अहिर यांचे बंधू सुनील अहिर यांना संधी दिली आहे. मनसेतून ठाकरे यांच्या शिवसेनेत आलेले नितीन नांदगावकर यांनाही बेस्टवर संधी दिली आहे. शिक्षण समितीवर नामनिर्देशित नगरसेवक म्हणून शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांचा पुतण्या प्रियांक संदीप राऊत यांना संधी दिली आहे.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना संधी
शिवसेना (शिंदे) पक्षाने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना आपल्या सोबत घेतले आहे. या दोन गटाचे मिळून चार नगरसेवक आहेत. या नगरसेवकांनाही विविध समित्यांवर पाठवण्यात आले आहे. राष्ट्रवादी (अजित पवार)गटाच्या डॉ. सईदा खान यांना स्थायी समितीवर पाठवण्यात आले आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे अजित रावराणे यांना सुधार समितीवर पाठवण्यात आले आहे.
