निवडणुकांमध्ये गुंतलेले कर्मचारी व गाडय़ा यामुळे दुकानांवर छापे घालून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्याच्या पालिकेच्या कारवाईत यावर्षी थोडी ढिलाई आली होती. मात्र रविवारी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मालाड येथे पाच लाख रुपये किमतीच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या.
प्लास्टिक पिशव्यांचा अतिवापर टाळण्यासाठी शहरात २० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी आहे. मात्र तरीही बिनदिक्कतपणे भाजीवाल्यांपासून खाद्यपदार्थ विक्रेते अशा पिशव्या वापरतात. पालिकेच्या कारवाईनंतर दुकान तसेच मॉलमधून या पिशव्या हद्दपार झाल्या असल्या तरी भाजीविक्रेत्यांवर कारवाई करताना अनेक अडचणी येतात. त्यातच दोन निवडणुकांमुळे मनुष्यबळ व भरारी पथकाच्या गाडय़ाही अडकल्याने यावर्षी प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाईही काहीप्रमाणात थंडावली होती. मात्र पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाच्या भरारी पथकाने मालाड येथे एका टेम्पोमधील प्लास्टिक पिशव्यांनी भरलेल्या २० गोण्या हस्तगत केल्या.
या पिशव्या २० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या असून त्यांची अंदाजे किंमत पाच लाख रुपये आहे. त्याचप्रमाणे टेम्पोचालकाने गोदामामध्येही एवढाच साठा असल्याचे सांगितल्यानंतर गोदामावरही कारवाई करण्यात आली. सोमवारी या गोदामामधील प्लास्टिक पिशव्याही जप्त करण्यात येतील. जप्त केलेला माल जाळून न टाकता त्याचे बारीक तुकडे करण्यात येतील.
पालिकेकडून आतापर्यंत किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई केली जात होती. मात्र पिशव्यांच्या गोदामातूनच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात साठा जप्त करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. २०१२ मध्ये दहा हजार ७७३ जणांवर कारवाई करत १५ हजार ८२४ किलो प्लास्टिक जप्त केले होते.
६८ लाखांचा दंड
या कारवाईत ६८ लाख ६२ हजार रुपयांचा दंड वसूल केला. २०१३ मध्ये २ हजार ९८९ जणांवर कारवाई करत ५,८८२ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून ४१ लाख ५० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. २०१४ मध्ये ऑगस्टपर्यंत केवळ ६३९ जणांवर कारवाई करण्यात आली होती. त्यातून ३८१ किलो प्लास्टिक जप्त करून २३ लाख ३४ हजार दंड घेण्यात आला होता. आता पुन्हा प्लास्टिकविरोधी कारवाई जोरात सुरू झाली आहे.