मुंबई : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिने उलटले, तरीही महानगरपालिकेच्या शाळांना पुरेसे शिक्षक मिळालेले नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी, तसेच कार्यरत शिक्षकांवरील कामाचा बोजा कमी करण्यासाठी पालिकेने शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. शिक्षण विभागातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून त्यांना येत्या ११ ऑगस्टपर्यंत शिक्षण सेवक पदासाठी अर्ज करता येणार आहे.

महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण विभागातर्फे विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र, सध्या पुरेशा शिक्षकांअभावी शिक्षण व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने विद्यार्थ्यांना अध्यापनात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे अनेक शाळांमध्ये दोन – तीन इयत्तांमधील विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसवून शिकवण्याची नामुष्की पालिकेच्या शिक्षण विभागावर ओढवली आहे. त्यामुळे महानगरपालिकेने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत शिक्षण सेवक संवर्गातील एकूण ९३५ रिक्त सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. मराठी, इंग्रजी, चित्रकला, संगीत यासाठी ही भरती होणार असून शिक्षक सेवकांना १६ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

या पदांसाठीची जाहिरात, सामाजिक व समांतर आरक्षणाचा तपशील, शैक्षणिक अहर्ता, अटी व शर्ती आदींची सविस्तर माहिती व अन्य महत्त्वाच्या सूचना महापालिकेच्या संकेतस्थळावर पाहता येतील. अर्ज मागविण्याची प्रक्रिया ६ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे. येत्या ११ ऑगस्टपर्यंत इच्छुक उमेदवारांना शिक्षक सेवक पदासाठी अर्ज करता येईल.