मुंबई : मतदारयादी सखोल पुनरिक्षण कार्यक्रमासाठी मुंबई महानगरपाालिका प्रशासनाने २ हजार २७५ शिक्षकांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्ती केली आहे. शिक्षकांची नियुक्ती करताना त्यांना शाळेचे काम सांभाळून निवडणुकीचे काम करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र निवडणूक कार्यालयात हजर झालेल्या शिक्षकांना अर्धवेळ नव्हे, तर पूर्णवेळ काम करण्याची सक्ती करण्यात येत आहे. परीक्षा तोंडावर असताना निवडणुकीचे पूर्णवेळ काम कसे करणार असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिकेकने निवडणुकीच्या कामासाठी प्राथमिक, माध्यमिक व खासगी अनुदानित शाळांमधील तब्बल २ हजार २७५ शिक्षकांची नियुक्ती केली आहे. शालेय व्यवस्थापन सांभाळून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न करता निवडणुकीचे काम करावे, असे महापालिका प्रशासनाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यानुसार सकाळच्या सत्रातील शिक्षकांनी दुपारी निवडणुकीचे, तर दुपारच्या सत्रातील शिक्षकांनी सकाळी निवडणुकीचे काम करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षकांना तातडीने मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार निवडणूक कर्तव्य लागलेल्या शिक्षकांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी लावली.
पूर्णवेळ काम करण्यास शिक्षकांचा नकार
जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित झालेल्या शिक्षकांना त्यांची शाळा असलेल्या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कार्यालयात जाण्यास सांगण्यात आले. मात्र तेथे गेल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना पूर्णवेळ काम करावे लागेल, असे बजावले. तसेच आम्ही स्वेच्छेने पूर्णवेळ काम करण्यास तयार असल्याचे त्यांना लेखी देण्यास सांगितले. मात्र पूर्णवेळ निवडणुकीचे काम केल्यास विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घेणार, त्यांचे निकाल कसे लावणार असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. मात्र त्यावर कोणतेही उत्तर शिक्षकांना मिळत नसल्याने काय करावे, असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे.
बीएलओसाठी अधिक शिक्षक पाठविण्याच्या सूचना
महानगरपालिकेने बीएलओ पदासाठी पाठविलेल्या २ हजार २७५ कर्मचाऱ्यांची नावे निवडणूक कार्यालयाला कळवली आहेत. मात्र बीएलओसाठी अधिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याने शिक्षणाधिकाऱ्यांनी आता शाळांच्या मुख्याध्यापकांना शिक्षकांची नावे बीएलओ पदासाठी पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. विभागाकडून थेट नावे दिल्यास त्याला शिक्षकांचा विरोध असल्याने शाळा मुख्याध्यापकांनीच शिक्षकांचे नाव सूचवावे, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मात्र बीएलओ म्हणून एखाद्या शिक्षकाचे नाव सूचविल्यास त्याचे परीक्षा कालावधीतील काम, उत्तर पत्रिका तपासणे, निकाल तयार करणे ही कामे कोण करणार असा प्रश्न मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाला आहे.
परीक्षा कशी घ्यायची…
काही शाळांमधील १५ पैकी १२ शिक्षकांची निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे पूर्णवेळ शिक्षक पाठविल्यास परीक्षा कशी घ्यायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये गरीब घरातील विद्यार्थी शिकत असल्याने त्यांच्या गुणवत्तेकडे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहेत. – राजेंद्र मोहिते, मुंबई महानगरपालिका शिक्षक सभा, सरचिटणीस
