मुंबई : कुठेही बाहेर असताना तहान लागली तर पाण्याची बाटली आपण विकत घेतो. पण एकेकाळी ही सोय नव्हती, तेव्हा मात्र रस्त्यावर बांधलेल्या पाणपोया अर्थात प्याऊशिवाय पर्याय नवह्ता. मुंबईत दीडशे, दोनशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी आणि त्याकाळातील श्रीमंतांनी बांधलेल्या देखण्या पाणपोया आता दूरवस्थेत आहेत. पुरातन दर्जाच्या या पाणपोयांची डागडुजी करून मुंबईची पुरातन कला आणि फुकट पाणी देण्याची संस्कृती जपण्याचे पालिकेने ठरवले आहे. त्या अंतर्गत १७ पुरातन पाणपोयांची दुरुस्ती करण्यात येणार असून त्याकरीता मुंबई महापालिकेने निविदा मागवल्या आहेत. या कामासाठी सुमारे १६ कोटी रुपये खर्च अंदाजित आहे.
पूर्वी मुंबई शहरात वाटसरुंची, तसेच प्राण्यांची तहान भागवण्यासाठी विविध ठिकाणी पाणपोई अर्थात प्याऊंची निर्मिती करण्यात आली होती. या प्याऊंचे संचालन धर्मादाय संस्था अथवा दात्यांकडून केले जात असे. गेल्या काही वर्षात वापरात नसल्यामुळे या पाणपोयांची दूरवस्था झाली होती. काही वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेने या पाणपोयांचा शोध घेतला. अशा ३० पाणपोयांचा जिर्णोद्धार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
अत्यंत देखण्या अशा पाणपोयांचे हे सौंदर्य, पुरातन वास्तू आणि फुकट पाणी देण्याची आपली संस्कृती जपण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला. मुंबईच्या वसाहतींसाठी तसेच, अन्य प्राणी-पक्ष्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी इंग्रजांच्या काळात लहान-मोठ्या पाणपोई आणि कारंजे बांधण्यात आले. कालांतराने या पाणपोई आणि कारंजे लुप्त होत गेले. रस्त्यांसह अन्य प्रकल्पांच्या कामांत पाणपोई अर्ध्यापेक्षा अधिक जमिनीखालीही गेल्या.
याआधी मुंबईतील १३ पाणपोईचे जीर्णोद्धार व दुरुस्ती करण्यात आली आहे. यामध्ये भायखळा येथील वीरमाता जिजाबाई उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात तीन पाणपोईंचा काही वर्षापूर्वी जिर्णोध्दार केला. तर पाण्याचे कारंजे पुनर्संचयित करण्यात आले आणि त्यांना नवा साज दिला. जीर्णोद्धाराच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेने संवर्धन स्थापत्यकाराचीही सल्लागार म्हणून नेमणूक केली असून त्यांच्या देखरेखीखाली ही कामे होत आहेत.
याव्यतिरिक्त दक्षिण मुंबईतील वासुदेव बळवंत फडके रोडवरील (पूर्वीचा धोबीतलाव) मेट्रो सिनेमाजवळील १०० वर्षांहून अधिक जुन्या माधवदास कोठारी पाणपोईच्या संवर्धनाचे काम पूर्ण करण्यात आले. ही पाणपोई प्राण्यासाठी होती. मुंबईतील एक अतिशय अनोखी असलेली वास्तुशिल्प असून बेसाल्ट आणि मऊ पोरबंदर दगडात ही पाणपोई बांधण्यात आली आहे.अशाच प्रकारे मुंबईतील आणखी १७ पाणपोईंची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी गुरुवारी निविदा काढण्यात आली. कंत्राटदाराची निवड केल्यानंतर ही कामे वर्षभरात पूर्ण केली जाणार आहेत. या कामासाठी १६ कोटी ३५ लाख ५० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
पाणपोई कोणत्या
– धोबी तलाव जक्शनजवळील सर कावासजी जहांगिर कारंजे
– फोर्टमधील श्यामाप्रसाद मुखर्जी चौक परिसरातील रामजी सेतिबा पाणपोई
– मशिद बंदर उड्डाणपुलाजवळील पाणपोई
– मोहम्मद अली रोडवरील पाणपोई
– डोंगरीमधील नवरोजी हिल रोडवरील चार नाळ फाउंटन
– ग्रँण्ट रोड, कामाठीपुरा येथील दोन टाकमधील पाणपोई
– माझगाव फेरबंदरमधील मानोकजी पटेल पाणपोई
– माझगावमधील नबाव अयाज अली पाणपोई
– सर कावासजी जहांगिर फाऊंटन
– माटुंगा महेश्वरी उद्यानमधील सेठ देवराम केशवजी पाणपोई
– हिंदू कॉलनीतील एम. व्ही. परुलकर फाउंटन
– परेल बाटलीवाला स्ट्रीटजवळील सर कावासजी जहांगिर फॉउंटन
– लोअर परेलमधील पेनिनसुला पार्कमधील कारंजे
– दादर कोतवाल उद्यानातील इंदिराबाई सहस्रबुद्धे पाणपोई
– दादर शिवाजी पार्क आणि कोहिनूर जक्शनजवळील रामजी सेतिबा दोन पाणपोई – वांद्रे पश्चिममधील सँन्ट अँण्ड्र्यू चर्च येथील पाणपोई
