मुंबईत अद्ययावत कर्करोग रुग्णालय ; महापालिकेचा निर्णय; केमोथेरपीचे दुष्परिणाम टाळणारी नवी उपचारपद्धती उपलब्ध

भारतात प्रथमच प्रोटोन थेरपीचा वापर करून या रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.

मुंबई : सर्वसामान्य व गरीब कुटुंबांतील कर्करुग्णांना स्वस्तात उपचार मिळावेत या उद्देशाने पालिकेने मुंबईत अत्याधुनिक असे कर्करोग रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कर्करोगाच्या गाठीवर अचूक व अत्यंत किफायतशीर दराने उपचार करता येतील अशी ‘प्रोटॉन थेरपी’ या रुग्णालयात देण्यात येणार आहे. या रुग्णालयासाठी मुंबईत जागा निश्चित करून नियोजन व अंमलबजावणी करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिका शहरात अद्ययावत असे कर्करोग उपचार केंद्र सुरू करणार आहे. भारतात प्रथमच प्रोटोन थेरपीचा वापर करून या रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.

प्रोटोन थेरपीसह केमोथेरपी, मॅमोग्राफी, सोनोग्राफी, डेटा अनालेसीस, ब्रेकीथेरपीसह कर्करोगावरील अत्याधुनिक उपचार सुविधा मिळणार आहेत. गरीब रुग्णांना या उपचारांसाठी खासगी किंवा उपलब्ध संस्थांच्या अपुऱ्या आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. या ठिकाणच्या प्रतीक्षा यादीमुळे आजार आणखी बळावल्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पालिकेने कर्करोग उपचार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. हा सल्लागार प्रोटोन थेरपीसाठी तांत्रिक तपशील आणि यंत्रसामग्रीचे तपशील तयार करणे, प्रकल्पाचा आराखडा तयार करणे, मुंबईत प्रकल्पासाठी जागा निश्चित करणे, पुरवठादार ओळखणे आणि कामकाज वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी पर्यवेक्षण करणे अशी कामे करणार आहे.

प्रकल्प कसा?

* तीन एकर क्षेत्रावर हे कर्करोग रुग्णालय उभारले जाणार आहे.

* या प्रकल्पासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून सल्लागारासाठी दोन कोटी ८० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. 

* या प्रकल्पासाठी प्रकल्प अहवाल सादर करण्याकरिता पालिकेच्या तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

* केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता व रेडिओलॉजी विभागप्रमुख डॉ. हेमंत देशमुख हे समितीचे अध्यक्ष आहेत.

प्रोटोन उपचारपद्धती म्हणजे काय?

प्रोटोन उपचारपद्धतीद्वारे कमीत कमी मात्रेचा डोस देऊन कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यात येतात. केमोथेरपीचे सर्व दुष्परिणाम टाळून शरीरातील इतर पेशी न मारता फक्त कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करणारी आणि केवळ कर्करोगाच्या गाठीवर लक्ष्य करणारी ही किरणोत्सर्ग (रेडिएशन) प्रकारातील प्रोटोन उपचारपद्धती आहे. कर्करोगावरील सर्वात अत्याधुनिक व प्रभावी अशी ही उपचारपद्धती मानली जाते. प्रोटोन थेरपीसह मॅमोग्राफी, सोनोग्राफी या सुविधादेखील उपलब्ध होणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bmc to build high tech cancer hospital in mumbai zws

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या