मुंबई : पावसाच्या पाण्याचा निचरा करून ते समुद्रापर्यंत वाहून नेण्यासाठी असलेल्या ब्रिटिशकालीन भूमिगत कमानी पर्जन्य जलवाहिन्यांचे मजबूतीकरण करण्याचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात शहर भागातील पावसाच्या पाण्याचा निचरा वेगाने होण्याची शक्यता आहे. तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता दुप्पट करण्याचाही निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
मुंबईच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे आणि मुंबईत खाडी परिसर देखील आहे. पावसाळ्यात मुंबईत अतिवृष्टी होते तेव्हा पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी जमिनीखाली पर्जन्यवाहिन्या ब्रिटिशकाळापासून बांधलेल्या आहेत. कमानी किंवा बंदीस्त पद्धतीच्या या पर्जन्य जलवाहिन्यांमधून पावसाचे पाणी समुद्रात जाते.
शहर विभागात ४९५ किलोमीटर लांबीच्या पर्जन्य जलवाहिन्या आहेत. तसेच पूर्व आणि पश्चिम उपनगरांत प्रत्येकी ६३ किलोमीटर, असे एकूण ६२१ किलोमीटर लांबीच्या कमानी पर्जन्य जलवाहिन्या आहेत. मात्र या भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांची गेल्या काही वर्षात पडझड झाली आहे. त्यामुळे या पर्जन्य जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्याचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे.
पाण्याचा निचरा वेगाने होणार महानगरपालिकेने मुंबई शहर विभागातील १०० वर्षे जुन्या भूमिगत कमानी पर्जन्य जलवाहिन्यांचे मजबुतीकरण करण्याचे ठरवले आहे. यामुळे ब्रिटिशकालीन या कमानी पर्जन्य जलवाहिन्यांचे आयुष्य किमान ५० वर्षांनी वाढणार आहे. तसेच पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढण्यासह अतिवृष्टीदरम्यान पावसाच्या पाण्याचा निचरा वेगाने होऊ शकेल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला
आयआयटीची मदत
मुंबई शहर परिसरात भूमिगत कमानी पर्जन्य जलवाहिन्या अस्तित्वात आहेत. त्याची साफसफाई / त्यातून गाळ काढण्याचे काम नियमितपणे केले जाते. जुन्या झालेल्या कमानी पर्जन्य जलवाहिन्यांच्या काही भागांमध्ये अनेक भेगा, विटांचे विस्थापन, दोन विटांमधील सांध्यांचे नुकसान, छताचा भाग कोसळणे यासह काही इतर दोष हे प्रचलन व परिरक्षण विभागाद्वारे करण्यात आलेल्या सीसीटीव्ही सर्वेक्षणात आढळून आले होते. त्यात २३ हजार ५४८ मीटर लांबीच्या ५६ कमानी पर्जन्य जलवाहिन्या दोष अवस्थेत आढळल्या. यापैकी १४ हजार २८५ मीटर लांबीच्या २७ कमानी पर्जन्य जलवाहिन्या (टप्पा क्रमांक १ मध्ये) तातडीने पुनर्वसन करण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले.
महानगरपालिकेने याबाबत भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आय.आय.टी. मुंबई) आणि वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्ही. जे. टी. आय.) या दोन्ही संस्थांशी चर्चा करून जुन्या कमानी पर्जन्य जलवाहिन्यांच्या पुनर्वसनासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञान निवडले आहे. त्यानुसार शहर विभागातील कमानी जलवाहिन्यांची डागडुजी सुरू आहे.
पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढणार
मागील काही वर्षांत हवामान बदलांमुळे मुंबईत पावसाळ्यात अवघ्या काही दिवसात सुमारे १ हजार मिमी पाऊस कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. अतिजोरदार पावसामुळे मुंबईत सखल भागांमध्ये प्रसंगी पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होते. या पार्श्वभूमीवर पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता दुप्पट करण्याचा प्रयत्न असल्याचे पालिकेच्या प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) कल्पना राऊळ यांनी सांगितले.
