scorecardresearch

कंत्राटदाराने दर वाढविल्याने रुग्णालयांना महागाईची झळ ; फळे, भाज्यांची खरेदी महागली

शहर व उपनगरातील रुग्णालयांना वर्षभर भाज्या व फळे पुरवण्यासाठी १२३ कोटी रुपये खर्च करणार आहे.

मुंबई : बाजारात भाज्या, फळे, धान्य, तेलाचे भाव वाढलेले असताना पालिकेच्या रुग्णालयांना स्वस्तात भाज्या-फळे उपलब्ध करणाऱ्या कंत्राटदारांची चौकशी करण्याची मागणी गेल्यावर्षी स्थायी समिती सदस्यांनी केली होती. यावर्षी मात्र कंत्राटदाराने फळे व भाज्यांच्या पुरवठय़ासाठी गेल्या वर्षीपेक्षा जास्त दराची आकारणी केली आहे. बाजारभावापेक्षा हे दर कमी असल्याचा दावा करीत प्रशासनाने या कंत्राटदाराला कंत्राट देण्याची शिफारस केली आहे. शहर व उपनगरातील रुग्णालयांना वर्षभर भाज्या व फळे पुरवण्यासाठी १२३ कोटी रुपये खर्च करणार आहे.

शहर व उपनगरातील पालिकेच्या रुग्णालयांना फळे व भाजीपाला पुरवठा करण्यासाठी कंत्राटदार नियुक्त करण्याकरीता पालिकेने निविदा मागवल्या होत्या. कंत्राटदाराने मागच्या वेळेपेक्षा १२ ते ५५ टक्के जास्त दराने निविदा भरली आहे. गेल्यावर्षी कंत्राटदाराने निविदेमध्ये फळे व भाज्यांसाठी अतिशय कमी दर भरले होते. ९ रुपये किलो कोबी, १६ रुपये किलो कांदे, ७ रुपये किलोने वांगी, ७४ रुपये किलोने मूगडाळ असे दर भरल्यामुळे स्थायी समितीमध्ये त्यांच्या बाजारभावावरून चांगलीच खमंग चर्चा रंगली होती. इतक्या स्वस्तात भाज्यांचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली होती. यावेळी या दरांमध्ये किंचित वाढ झाली आहे. मात्र बाजारभावापेक्षा हे दर कमी असल्याचे सांगत प्रशासनाने कंत्राटदारांची शिफारस केली आहे.

गवार, कारले, दोडके, फरसबी या भाज्यांचे दर तेवढेच असले तरी कोिथबीर, कढीपत्ता, फ्लॉवर, नारळ यांचे दर मात्र वाढलेले आहेत. कंत्राटदार देत असलेले दर हे अशक्यप्राय असल्याचा दावा स्थायी समिती सदस्यांनी केला होता. रुग्णालयांना लागणारे धान्य, भाज्या एपीएमसी मार्केटमधून घ्यावे, असा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला होता. कंत्राटदार कुठून भाजीपाला आणणार आहे याची चौकशी करावी, अशी मागणी होऊ लागली होती. इतक्या स्वस्तात धान्य देणे म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचा मुद्दाही सदस्यांनी मांडला होता. यावेळी कंत्राटदारांनी जास्ती दर भरले असले तरी ते बाजारभावापेक्षा कमीच असल्यामुळे पुन्हा तोच मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bmc to spend rs 123 crore for vegetables and fruits to city and suburban hospitals zws

ताज्या बातम्या