महाराष्ट्राप्रमाणेच मुंबईमध्ये देखील अनेक बाबतीत करोनाच्या नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून मूलभूत नियमांचं पालन करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेकडून अशा नागरिकांवर कारवाई करण्यासाठी क्लीन-अप मार्शल्सची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या क्लीनअप मार्शल्सकडून चुकीच्या पद्धतीने मुंबईकरांकडून पैसा उकळला जात असल्याचं एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आलं होतं. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अशा क्लीन-अप मार्शल्सवर आणि त्यांच्या कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई होणार असल्याचं जाहीर केलं आहे. यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.