मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयासमोर जीर्णावस्थेत असलेल्या क्रीडाभवन इमारतीच्या भूखंडाच्या क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करून मुंबई महापालिकेला फायदेशीर ठरेल असा पुनर्विकास करण्याचे महापालिकेने ठरवले असून या ठिकाणी टाऊनहॉल जिमखाना बांधण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांकरीता टाऊन हॉल सुविधा देण्याबरोबरच पर्यटकांसाठी सोयी – सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला असता तो अपूर्ण असल्याचा मुद्दा उपस्थित करीत सर्वच सदस्यांनी सुधारित प्रस्ताव सादर करण्याची मागणी केली. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हा प्रस्ताव राखून ठेवला.
पालिका मुख्यालयासमोर क्रीडा भवन असून त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे क्रीडा भवनाच्या जागी टाऊनहॉल जिमखाना साकारण्यात येणार असून शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. जिमखान्याची जागा मुंबईतील महत्त्वाच्या वारसाजतन परिसरात आहे. टाऊनहॉल इमारतीची संकल्पना साकारताना नागरिकांना सुविधा देण्याबरोबरच भविष्यात भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी दर्शक गॅलरी, काचेचा घुमट, अद्ययावत पारदर्शक उद््वाहन, छतावर उपाहारगृह आदी गोष्टींचा समावेश त्यात करण्यात आला आहे. पुरातन वारसा जतन परिसराचे महत्त्व लक्षात घेऊन आजूबाजूच्या वारसा वास्तूंशी सुसंगत राहण्यासाठी कमी उंचीची इमारत बांधण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला होता. यावेळी शिवसेना (शिंदे) पक्षाचे गटनेते अमेय घोले यांनी या प्रस्तावात त्रुटी असून सुधारित प्रस्ताव सादर करण्याची मागणी केली.
पालिकेच्या जिमखान्यात क्रीडा भवनाचे १२ हजार सदस्य असून त्यांना काय सुविधा देणार, याबाबत संपूर्ण सविस्तर प्रस्ताव सादर करा, अशी मागणी अमय घोले यांनी शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केली. घोले यांच्या मागणीला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला. अखेर अध्यक्षांनीप्रस्ताव राखून ठेवत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रभाकर शिंदे यांनी प्रशासनाला दिले.
नगरसेवकांच्या गाड्यांसाठी वाहनतळ हवे
स्थायी समिती अध्यक्ष, विविध समित्यांचे अध्यक्ष यांची वाहने उभी करण्यासाठी पालिका मुख्यालयाच्या आवारात जागा दिली जाते.परंतु नगरसेवकांना जागा उपलब्ध होत नसल्याने त्यांना आपल्या गाड्या रस्त्यावर उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे नगरसेवकांची वाहने उभी करण्यासाठी टाऊनहॉल जिमखानामध्ये जागा द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या (शिंदे) नगरसेविका यामिनी जाधव यांनी केली.
