मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध ‘काळा घोडा’ कला महोत्सवात महानगरपालिकेच्या नियोजन विभागातर्फे स्थापित करण्यात आलेल्या ‘उमंग’ या तृतीयपंथी बचत गटाच्या दालनाने कलाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘उमंग’ बचत गटाने हस्तकलेच्या वस्तूंना कलाप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला. अवघ्या तीन दिवसांत या बचत गटाने ९० हजार रुपयांच्या वस्तूंची विक्री केली आहे.

समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या घटकांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी महानगरपालिका सातत्याने विविध योजना राबवित असते. त्याच अनुषंगाने गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महानगरपालिकेचा नियोजन विभाग महिला बचत गटांना अर्थसहाय्य करते. बचत गटांनी तयार केलेल्या उत्पदनांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळावी, प्रसिद्धी मिळावी तसेच त्यातून बचत गट सदस्यांना आर्थिक उत्पन्न मिळावे, यासाठी महानगरपालिका विविध प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते.

याच धोरणाअंतर्गत तृतीयपंथीयांना सामाजिक प्रतिष्ठा आणि हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी फेब्रुवारी २०२४ मध्ये के पश्चिम विभागात ‘योगी राणी’ आणि त्यांच्या ९ सहकाऱ्यांनी मिळून ‘उमंग बचत गटा’ची स्थापना केली. महानगरपालिकेतर्फे या गटाला सुरुवातीला १० हजार रुपयांचे अनुदान आणि आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले. योगी राणी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना आभूषणे बनविण्याची कला शिकवली.

उमंग बचत गटाचा प्रवास आता ‘काळा घोडा कला महोत्सवा’सारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या महोत्सवापर्यंत पोहोचला आहे. कलाकारांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी मुंबईतील काळा घोडा महोत्सव ओळखला जातो. यंदाच्या उत्सवात नियोजन विभागाच्या संचालक डॉ. प्राची जांभेकर यांच्या पुढाकाराने उमंग बचत गटाला काळा घोडा उत्सवात प्रदर्शनासाठी दालन उपलब्ध करून देण्यात आला. ज्यूट बॅग्स, आकर्षक आभूषणे आणि विविध शोभेच्या वस्तूंनी सजलेल्या या दालनाला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण महोत्सवात ‘सर्वात कमी दर आणि सर्वोत्तम डिझाइन्स’ असलेले दालन म्हणून उमंग बचत गटाचे कौतुक झाले.

आम्हाला आमची कला आणि कौशल्य दाखविण्यासाठी या महोत्सवात मोठी संधी मिळाली. तीन दिवसांत ९० हजार रुपयांची विक्री होणे, ही आमच्या उदरनिर्वाहासाठी मोठी बाब आहे. पुन्हा अशी संधी मिळाल्यास आम्ही सन्मानाने जगू शकतो, अशी भावना उमंग गटाच्या योगी राणी यांनी व्यक्त केली.