मुंबई : अनधिकृत जाहिरातींमुळे होणारे मुंबई महानगरातील विद्रूपीकरण रोखण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. मुंबईला प्लास्टिक व अनधिकृत फलकांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी अनधिकृत फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्सविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ (शून्य सहिष्णुता) धोरण राबवण्याचे निर्देश महापौरांनी दिले. अधिकृत जाहिरातींवर परवाना क्रमांक, मुदत, मुद्रकाचे (प्रिंटरचे) नाव आणि अधिकृत क्यूआर कोड छापणे बंधनकारक करण्यात येणार असून बेकायदा फ्लेक्स, बॅनर्स व पोस्टर्स छापणाऱ्या प्रिंटर्स, कंत्राटदार आणि एजन्सी यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली जाणार आहे.
मुंबईत सणासुदीच्या काळात आणि राजकीय कार्यक्रमांदरम्यान मोठ्या प्रमाणावर जाहिरात फलक लावले जातात. बहुतांशी फलक अनधिकृत असतात. तर कार्यक्रम झाल्यानंतर हे फलक काढले जात नाहीत. या जाहिरात फलकांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश रितू तावडे यांनी दिले. महापौरांनी आयुक्त अश्विनी भिडे यांना याबाबत पत्र पाठवले आहे. जाहिरात प्रदर्शित करण्याबाबत तातडीने धोरणाची आखणी होऊन, प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली, आमदार अमित साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच प्रशासनाची संयुक्त बैठकही आयोजित केली जाणार आहे.
राजकीय पक्षांच्या प्रमुखांना पत्र पाठवणार
सार्वजनिक हिताच्या या पर्यावरणपूरक मोहिमेला सर्वपक्षीय पाठबळ मिळावे यासाठी महापौरांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना व नेत्यांना पत्र पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. अनधिकृत बॅनर्स, फलक लावले जावू नयेत, यासाठी सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांना महापौर आवाहन करणार असून सहकार्यासाठी पुढाकार घेणार आहेत. यानिमित्ताने सर्व पक्षांनी एका व्यासपीठावर येऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापौरांनी केले. प्रस्तावित असलेल्या जाहिरात धोरणांतर्गत कारवाईदरम्यान कोणताही राजकीय भेदभाव केला जाणार नाही. कायदा सर्वांसाठी समान असेल. मुंबई महानगरपालिका कायदा कलम ३२८ / ३२८(अ) आणि महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंध अधिनियम, १९९५ अंतर्गत दोषींवर थेट दंडात्मक कारवाई केली जाईल. आवश्यकता भासल्यास पोलिसांत गुन्हे नोंदवले जातील, असेही महापौरांनी स्पष्ट केले.
जाहिरातींवर क्यू आर कोड नसल्यास कारवाई
मुंबई महानगरपालिकेने रीतसर परवानगी दिलेल्या अधिकृत जाहिरातींवर परवाना क्रमांक, मुदत, मुद्रकाचे (प्रिंटरचे) नाव आणि अधिकृत ”QR कोड” छापणे बंधनकारक राहील. गस्ती पथके किंवा सामान्य नागरिक हा क्यूआर कोड स्कॅन करून परवान्याची सत्यता तपासू शकतील. क्यूआर कोड नसलेला कोणताही फलक, बॅनर, पोस्टर्स आदी अनधिकृत मानून त्वरित जप्त करावी, असेही महापौरांनी स्पष्ट केले.
बेकायदा फलकबाजी करणाऱ्यांवर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई
वारंवार अनधिकृतपणे फ्लेक्स, बॅनर्स व पोस्टर्स आदी छापणारे प्रिंटर्स, कंत्राटदार आणि एजन्सींवर केवळ दंड न आकारता त्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकले जाईल. तसेच एजन्सींना पीव्हीसीऐवजी कापडी, इको-फ्रेंडली साहित्य व डिजिटल एलईडी पर्यायांचा वापर करण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. सध्याच्या ‘आऊटडोअर जाहिरात धोरणा’अंतर्गत कालबद्ध सुधारणा करून सर्व परवानग्या एकल खिडकी डिजिटल प्रणालीद्वारे दिल्या जातील. यामुळे अनधिकृत फलकांमुळे महानगरपालिकेचा कोट्यवधी रुपयांचा बुडणारा परवाना महसूल वाचेल आणि महानगरपालिकेच्या महसुलात भर पडेल.
जप्त साहित्याची शास्त्रोक्त विल्हेवाट
जप्त केलेले पीव्हीसी आणि प्लास्टिक साहित्य पुन्हा रस्त्यावर किंवा नाल्यांमध्ये जाणार नाही, याची दक्षता घेऊन घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाईल. अनधिकृत फलकांची तक्रार करण्यासाठी नागरिकांना महानगरपालिकेचा मदत क्रमांक १९१६, अधिकृत संकेतस्थळ आणि ”mybmc” ॲपचा वापर करता येईल. प्राप्त तक्रारींवर कमाल ७२ तासांत कारवाई करावी. प्रत्येक प्रभागातील कारवाई, वसूल केलेला दंड आणि दाखल गुन्ह्यांचा साप्ताहिक डॅशबोर्ड महापौरांना सादर करण्यात येईल.
