मुंबई : मुंबई महानगरपालिकेने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात १६४ अनधिकृत शाळा बंद करण्याची नोटीस संबंधित शाळा प्रशासनाला बजावली आहे. या अनधिकृत शाळांमधील ४,९९० विद्यार्थ्यांपैकी १,२४० विद्यार्थ्यांचे मान्यताप्राप्त शाळांमध्ये समायोजन करण्यात आले. मात्र उर्वरित ३,७५० विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न कायम आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांच्या समायोजनासाठी पालकांकडून सहकार्य मिळत नाही, असे मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातून सांगण्यात आले.
मुंबई महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत शाळांना नाेटीसा पाठवून त्या बंद करण्याच्या सूचना दिल्यानंतर या शाळांतील विद्यार्थ्यांना मान्यताप्राप्त शाळांमध्ये मोफत प्रवेश उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार, ६९० विद्यार्थ्यांना पालिकेच्या शाळांमध्ये, तर ५५० विद्यार्थ्यांना पालिकेच्या अनुदानित खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला.
तसेच पालकांच्या प्रतिसादाअभावी उर्वरित विद्यार्थ्यांचे समायोजन रखडले असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. गोवंडीतील एम-पूर्व विभागात अनधिकृत शाळांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिवाजीनगर येथील नव्या पालिका शाळेच्या इमारतीत विशेष प्रवेश केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र, या केंद्राला पालकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
कारवाईला न्यायालयीन आव्हान
नोटिसा बजावलेल्या १६४ शाळांपैकी ७७ शाळांच्या व्यवस्थापनांविरोधात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केले आहे. एफआयआर दाखल झालेल्या ७७ शाळांपैकी ७० शाळांच्या व्यवस्थापनांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्यापैकी एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी होईपर्यंत शाळेविरोधात सक्तीची कारवाई करू नये, असे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशासह अन्य याचिकांबाबत पालिकेने विधि विभागाकडून मार्गदर्शन मागवले आहे. तसेच अधिकृत माध्यमिक विभाग सुरू असलेल्या ४५ प्राथमिक शाळांना मान्यता मिळावी, यासाठी पालिकेने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवले आहेत. या प्रस्तावांवरील निर्णय अद्याप प्रलंबित आहे.
परवानगी मिळण्याबाबत मुख्याध्यापकांचे आश्वासन
मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण द्यायचे होते. मात्र, घराजवळील पालिका शाळेत पूर्णपणे इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जात नाही. पालिकेने शाळा अनधिकृत असल्याचे सांगितले असले तरी मुख्याध्यापकांनी लवकरच आवश्यक परवानग्या मिळतील आणि मुलांचे शिक्षण प्रभावित होणार नसल्याचे पालकांकडून सांगण्यात आले.
