मुंबई : आयुक्त व महापौर वगळता उर्वरित सर्व अतिरिक्त आयुक्त, अधिकारी व पदाधिकाऱ्यांना एकाच दर्जाच्या एकाच प्रकारच्या गाड्या द्याव्यात, जेणेकरून गाड्यांच्या मॉडेलवरून होणारे वाद आणि भेदभाव कायमचे बंद होतील, असे मत सभागृह नेते गणेश खणकर यांनी व्यक्त केले आहे. मुंबई महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना प्रशासनाने आधी दिलेल्या स्कॉर्पिओ गाड्या बदलून इनोव्हा गाड्या देण्याची मागणी काही पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावरून गदारोळ झाल्यानंतर गुरुवारी गणेश खणकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नवीन गाड्यांची मागणी केलेली नाही तर भाडेतत्वावरील गाड्यांचे मॉडेल बदलून देण्याची मागणी काहींची असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी महागड्या गाड्यांची मागणी केल्याच्या वृत्तामुळे गेल्या काही दिवसांपासून पालिका वर्तुळात वादंग निर्माण झाला आहे. मात्र, या गाड्या विकतच्या नसून त्या भाडेतत्त्वावरील आहेत. सध्या असलेल्या गाड्यांमुळे पाठदुखीचा त्रास होत असल्याची तक्रार विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासह सर्वांनीच केली होती. त्यामुळे त्याच भाडेतत्त्वावर दुसऱ्या गाड्यांची मागणी केल्याचे खणकर यांनी सांगितले. तर प्रत्यक्षात आपण गाडीचा फार वापर करतच नाही, असेही त्यांनी सांगितले.

खणकर यांनी सांगितले की, मी दहिसरला राहत असल्यामुळे मी बहुतांशी उपनगरीय लोकलने येतो आणि जातो. मात्र, अनेक पदाधिकाऱ्यांनी या गाड्यांची मागणी केली होती. तसेच, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी कितीही नाकारले असले तरी त्यांनीही दुसऱ्या गाडीची मागणी केली होती, असेही ते म्हणाले. महापालिकेतील भाडेतत्वावरील गाड्यांच्या प्रस्तावावरून सुरू झालेल्या वादानंतर सभागृह नेते गणेश खणकर यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केला. ‘यापुढे विरोधकांनी कोणतीही मागणी केली तर त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवणार नाही,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

पत्रकार परिषदेत बोलताना गणेश खणकर म्हणाले की, नगरसेवकांसाठी नव्या गाड्या खरेदी केल्या जात असल्याचे वृत्त चुकीचे आहे. चर्चेत असलेला प्रस्ताव हा अधिकाऱ्यांसाठी भाडेतत्वावरील पद्धतीने १६ वाहने उपलब्ध करून देण्याचा असून त्याचा नगरसेवकांसाठी गाड्या खरेदी करण्याशी कोणताही संबंध नाही. काही विरोधी सदस्यांनी प्रवासाच्या अडचणींमुळे गाड्या बदलून देण्याची मागणी केली होती. सभागृह नेते म्हणून त्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचविल्या.

मात्र, आता त्याच मागण्यांवरून राजकारण केले जात आहे. म्हणूनच आता विरोधकांनी कोणतीही मागणी केली तर आधी प्रतिज्ञापत्र घेईन, नाहीतर नंतर पलटी मारून आरोप करतात, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी महापालिकेत वाहनांच्या वाटपात भेदभाव होऊ नये, यासाठी आयुक्त आणि महापौर वगळता सर्व पदाधिकाऱ्यांना एकाच दर्जाची वाहने द्यावीत, अशी मागणीही केली.

सभागृह नेते एकाकी…

लोकप्रतिनिधींना देण्यात येणाऱ्या वाहनांवरून गदारोळ उठल्यानंतर सभागृह नेते गणेश खणकर यांनी गुरुवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गणेश खणकर यांनी एकट्यानेच पत्रकार परिषद घेतली. प्रत्यक्षात विरोधी पक्षनेते, स्थायी समिती अध्यक्ष, सुधार समिती अध्यक्ष, शिक्षण समिती अध्यक्ष यांनी गाड्यांची मागणी केल्याचे आरोप होत आहेत. मात्र, याबाबतचे स्पष्टीकरण देण्यासाठी गणेश खणकर एकटेच उपस्थित होते.