मुंबई : मुंबई महानगरपालिकेने वर्सोवा -दहिसर-भाईंदर सागरी किनारा मार्ग प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पासाठी गोरेगाव – चारकोप परिसरातील सुमारे एक हजार झाडे कापावी लागणार आहेत. तर कापलेल्या झाडांच्या बदल्यात पनवेलमध्ये झाडे लावण्यात येणार आहेत.

मुंबई महापालिकेने सागरी किनारा मार्गाचा उत्तर मुंबईतील भागाचे काम हाती घेतले आहे. वर्सोवा – दहिसर आणि पुढे भाईंदरपर्यंत हा मार्ग जाणार आहे. या सागरी किनारा मार्गामधील गोरेगाव आणि चारकोप परिसरातील काही झाडे बाधित होणार आहेत. ही झाडे हटवण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने वृक्षप्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावावर शुक्रवारी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. वादळी चर्चेनंतर या प्रकल्पाशी संबंधित सगळे प्रस्ताव मंजूर झाले. यावेळी भाजपचे नगरसेवक गणेश खणकर, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमोद सावंत यांनी चर्चेत सहभाग घेतला.

सगळ्या सोसायट्यांनी एक तरी झाड लावावे …

या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या झाडांच्या बदल्यात पनवेलमध्ये झाडे लावण्यास सभागृह नेते गणेश खणकर यांनी विरोध केला. मुंबईतील सोसायट्यांनी एक झाड लावले तरी नियमाचे पालन होईल, पर्यायी झाडांचा प्रश्न मिटेल, अशी सूचना खणकर यांनी केली.

या ठिकाणची झाडे हटवणार

वर्सोवा – गोरेगावच्या बांगुरनगरदरम्यान १८४ झाडे तोडण्यात येणार असून १६४ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. यारी रोड टनेल शाफ्ट परिसरात झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. या बदल्यात मुंबईबाहेर ३७९५ नवीन झाडे लावण्यात येणार आहेत.

बांगुरनगर – मालाड मायंडस्पेस दरम्यान २३६ झाडे कापावी लागणार असून ३९३ झाडांचे पुनर्रोपण पवई उद्यानात केले जाणार आहे. तर भरपाई म्हणून पनवेलमध्ये ६१०७ नवीन झाडे लावली जाणार आहेत.मालाड मायंडस्पेसमधील एमडीपी रोड, जो उपनगरातील एक महत्त्वाचा आणि आकर्षक रस्ता मानला जातो, येथे एकूण ८१५ झाडांवर परिणाम होणार आहे. त्यापैकी ११८ झाडे कापण्यात येणार असून ६९७ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. या बदल्यात पनवेलमध्ये ६८०५ नवीन झाडे लावण्यात येणार आहेत.

मायंडस्पेस – चारकोप टप्प्यात ४७ झाडांवर परिणाम होणार असून त्याच्या बदल्यात पनवेलमध्ये ५७५ झाडांची लागवड करण्यात येणार आहे. तर गोराई इंटरचेंज – दहिसर दरम्यान ८० झाडे तोडण्यात येणार असून १०२ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. या बदल्यात पनवेलमध्ये २२९२ झाडे लावण्यात येणार आहेत.

गोराई इंटरचेंजसाठी स्वतंत्रपणे १४० झाडे कापावी लागणार असून ८ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. त्याच्या बदल्यात पनवेलमध्ये ११९७ झाडांची लागवड करण्यात येणार आहे.

१६ हजार कोटी खर्च

वर्सोवा – दहिसर मार्ग एकूण १७.५७ किमी लांबीचा असून याकरीता १६,६२१ कोटी रुपये खर्च अंदाजित आहे. या मार्गाचे सहा टप्पे असून बांगूर नगर – माईंडस्पेस मालाड या दुसऱ्या टप्प्यात गोरेगाव – मुलुंड जोडरस्त्याला ४.४६ किमीचा एक जोड (कनेक्टर) देण्यात येणार आहे.

या संपूर्ण मार्गावर पूल, बोगदा, उन्नत मार्ग अशी गुंतागुंतीची रचना आहे. त्यामुळे भविष्यात हे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर मरीन ड्राईव्ह येथून सागरी किनारा मार्गावरून थेट दहिसर-भाईंदर पश्चिम, तसेच मुलुंडपर्यंत जाता येणार आहे.

प्रकल्पामुळे वेळ आणि इंधन खर्चात बचत

वर्सोवा – दहीसर सागरी किनारा मार्ग मुंबई महापालिकेतर्फे उभारला जात आहे. हा मार्ग पुढे दहिसर – भाईंदर उन्नत मार्गालाही जोडला जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नरिमन पॉईंट येथून थेट दहिसर, भाईंदरपर्यंत जाता येणार आहे. मुंबई किनारी रस्ता वर्सोवा – भाईंदर प्रकल्पामुळे पश्चिम उपनगरातील दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड इत्यादी भागातील रहदारी कमी व प्रवास गतिशील होणार आहे. तसेच, प्रवास वेळ, इंधन खर्चात माेठी बचत होणार आहे. वाहतूक व्यवस्थापनात देखील सुधारणा होणार असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.