मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही शहर आणि उपनगरांतील सार्वजनिक ठिकाणच्या वृक्षांच्या संवर्धनासाठी ‘वृक्ष संजीवनी’ अभियान राबविण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. जागतिक वसुंधरा दिनचे (२२ एप्रिल) औचित्य साधून १ ते ३० एप्रिल या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे.
आजघडीला मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सध्या एकूण २९ लाख ७५ हजार २८३ वृक्ष आहेत. त्यापैकी सुमारे १३ लाख ५४ हजार ९६६ वृक्ष रस्त्यांच्या कडेला, उद्यानांमध्ये व इतर सार्वजनिक ठिकाणी आहेत. या वृक्षांच्या आरोग्य संवर्धनासाठी मुंबईत ‘वृक्ष संजीवनी’ अभियान राबविण्यात येणार असून वृक्ष संवर्धनासाठी हे अभियान महत्त्वाचे ठरणार आहे.
या अभियान अंतर्गत वृक्षांभोवती साचलेले सिमेंट- काँक्रिट काढून त्याजागी मोकळी लाल माती टाकणे, झाडांच्या खोडांवर ठोकलेले खिळे, जाहिरात फलक, दोऱ्या व केबल्स काढणे, तसेच पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या फांद्यांची छाटणी करणे अशा उपाययोजना करण्यात येतात. झाडांच्या खोडांना गेरू-चुना लावून त्यांचे संरक्षण करण्याचे कामही या अभियानादरम्यान करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेने २०२५ मध्ये राबविलेल्या या मोहिमेदरम्यान ३४० वृक्षांभोवतीचे काँक्रिट काढण्यात आले होते. तसेच १ हजार ४६० झाडांवरील जाहिरात फलक हटविण्यात आले होते. यासोबत झाडांवरील तब्बल १७.४३ किलो खिळेही काढण्यात आले होते.
तज्ज्ञांच्या मते, वृक्षांच्या मुळांभोवती काँक्रिट असल्यास पाणी जमिनीत मुरत नाही, परिणामी मुळांची वाढ खुंटते आणि झाडे कोमेजण्याचा धोका वाढतो. तसेच खिळे, वायर व जाहिरात फलकांमुळे झाडांच्या खोडाला इजा होऊन भविष्यात झाडे कोसळण्याची शक्यता निर्माण होते. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष जतन व संवर्धन अधिनियम, १९७५ अंतर्गत जनजागृती करणे, हे वृक्ष प्राधिकरणाचे कर्तव्य असल्याने या अभियानाला विशेष महत्त्व आहे.
या अभियानात शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि नागरिकांचा सहभाग घेतला जाणार आहे. महानगरपालिकेच्या विविध विभागांतील कर्मचारीही यामध्ये सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, उपलब्ध संसाधनांचा वापर करून ही मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
