मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील १७ प्रभाग समित्यांपैकी आणखी सहा प्रभाग समित्यांसाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. त्यापैकी तीन प्रभाग समिती ठाकरे बंधूंच्या युतीला मिळाल्या. तर तीन प्रभाग समिती भाजपने मिळवल्या. भाजपला आतापर्यंत एकूण सहा प्रभाग समिल्यांचे अध्यक्षपद मिळाले आहे. दादर, माहीमचा समावेश असलेल्या जी उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी ठाकरे बंंधूंच्या दोन्ही पक्षांनी अर्ज भरले होते. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. मात्र शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यामुळे मनसेच्या यशवंत किल्लेदार यांची बिनविरोध निवड झाली. सहा प्रभाग समित्यांसाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. त्यात सगळ्या समित्यांची निवडणूक बिनविरोध झाली.
मुंबई महापालिकेच्या २५ विभागांच्या १७ प्रभाग समित्यांसाठी ५ मार्चपासून निवडणुका सुरू आहेत. सहा प्रभाग समित्यांसाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. आतापर्यंत एकूण १२ समित्यांसाठी निवडणूक पार पडली. गुरुवारी पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे नगरसेवक गैरहजर राहिल्यामुळे शिवसेना (ठाकरे) पक्षाला बालेकिल्ल्यातच पराभव पत्करावा लागला. त्यामुळे गुरुवारी शिवसेना (ठाकरे) पक्षाला एकही समिती मिळाली नाही. मात्र शुक्रवारी पार पडलेल्या सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी मिळून तीन समित्या जिंकल्या. तर उर्वरित तीन समित्या भाजपने जिंकल्या.
दादर, माहीमची प्रभाग समिती मनसेला
मुंबई महापालिकेची निवडणूक यावेळी ठाकरे बंधूंनी एकत्र लढवली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकत्र आले. ‘एकत्र आलो …एकत्र राहण्यासाठी’, अशीही भविष्यवाणी उद्धव ठाकरे यांनी केली. निवडणुकीत मनसेचे केवळ ६ नगरसेवक जिंकले. त्यानंतर ही युती टिकणार का, किती काळ टिकणार अशा चर्चा सुरू होती. त्यातच स्वीकृत नगरसेवक पदासाठी एक जागा देण्याची मागणी मनसेने उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती व त्याला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला नाही अशी चर्चा होती. दरम्यान, मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने तीनही स्वीकृत नगरसेवक आपल्याच पक्षातून पाठवले आहेत. त्यामुळे एखादे प्रभाग समिती अध्यक्षपद मनसेला सोडले जाणार असल्याचे समोर आले होते. त्यानुसार बुधवारी जी उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी अर्ज भरला. मात्र या प्रभाग समितीसाठी ठाकरे यांच्या शिवसेनेकडून जोसेफ कोळी यांनीही अर्ज भरल्यामुळे तिढा निर्माण झाला होता. मात्र निवडणुकीच्या आधी कोळी यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे किल्लेदार यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे ठाकरे बंधूंमधील युती टिकल्याची चर्चा आहे. तसेच मनसेचे किल्लेदार यांना मुंबई महापालिकेत पक्षाचे गटनेते व प्रभाग समिती अध्यक्ष अशी दोन पदे मिळाली आहेत.
हे बनले प्रभाग समिती अध्यक्ष
दादर जी उत्तर – यशवंत किल्लेदार (मनसे)
प्रभादेवी जी दक्षिण – पद्मजा चेंबूरकर शिवसेना (ठाकरे)
अंधेरी के पश्चिम – रोहन राठोड (भाजपा)
जोगेश्वरी के/दक्षिण व के/उत्तर – प्रकाश मुसळे (भाजपा)
गोरेगाव पी दक्षिण – श्रीकला पिल्ले (भाजपा)
एच/पूर्व व एच/पश्चिम – रोहिणी कांबळे ( शिवसेना ठाकरे)
.
