मुंबई : पाली हिल जलाशयाच्या पाणी पातळीत सुधारणा करण्यासाठी वांद्रे पश्चिम येथील रामदास नाईक मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग आणि आर. के. पाटकर मार्ग जंक्शनदरम्यान ७५० मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी नव्याने टाकण्यात आली आहे. ही नवीन मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम शनिवार, २८ मार्च रोजी रात्री ११ पासून रविवार, २९ मार्च रोजी सायंकाळी ५ च्या दरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे या १६ तासांच्या कालावधीत ‘एच पश्चिम’ विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद, तर काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे. तसेच पुढील ४ ते ५ दिवस पाणी उकळून – गाळून प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

‘या’ भागात पाणीपुरवठा बंद राहणार

  • १) संपूर्ण खार पश्चिम, संपूर्ण सांताक्रुझ पश्चिम व वांद्रे पश्चिम येथील काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४ ते सकाळी ८.३०) या भागात २९ मार्च रोजी पाणीपुरवठा बंद राहणार.
  • २) संपूर्ण बाजार मार्ग, जैन मंदिर मार्ग परिसर डि’मोंटे रस्ता परिसर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४ ते सकाळी ८.३०) या भागात २९ मार्च रोजी पाणीपुरवठा बंद राहणार.
  • ३) वांद्रे पश्चिमेकडील हिलरोड, पेरीरोड, मॅन्युअल गोन्साल्विस रोड, सेंट अँड्रयूज रोड, सेंट पॉल रोड, डॉमनिक रोड, आर. के. पाटकर रस्ता, न्यू आणि ओल्ड कांतवाडी, रणवार गाव, वरोडा मार्ग, कार्टर रोड, पालीमाला मार्ग, चिंबई गाव, शेर्ली गाव, राजनगाव, मालागाव आणि पालीगाव (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी १० ते दुपारी २) या भागात २९ मार्च रोजी पाणीपुरवठा बंद राहणार.
  • ४) खारदांडा कोळीवाडा, दांडपाडा, च्युइम गावठाण, गझदरबंद झोपडपट्टीचा काही भाग, खार पश्चिमेकडील काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ५.३० ते रात्री १०) या भागात २९ मार्च रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार.
  • ५) डॉ. आंबेडकर मार्गालगतचा परिसर, पाली गावठाण, पाली पठार, वांद्रे व खार पश्चिमेचा काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ रात्री १० ते मध्यरात्री १) या भागात २८ मार्च रोजी पाणीपुरवठा राहणार बंद).