scorecardresearch

..तर पाणी लवकर ओसरले असते

छोटय़ा उदंचन केंद्रांचा पालिकेला विसर

bmc-
मुंबई महापालिका (संग्रहित छायाचित्र)

छोटय़ा उदंचन केंद्रांचा पालिकेला विसर

ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाअंतर्गत सुचविण्यात आलेली चार लहान उदंचन केंद्रे उभारण्यास पालिकेला अद्यापपर्यंत मुहूर्तच मिळालेला नाही. ही उदंचन केंद्रे वेळीच उभारण्यात आली असती, तर मंगळवारी कोसळलेल्या मुसळधार पावसानंतर मुंबईला झटपट जलमुक्ती मिळू शकली असती. मुंबईकरांवर कोसळलेल्या अस्मानी संकटापासून बोध घेऊन पालिका आता तरी ही चार उदंचन केंद्रे उभारणार की नाही, असा सवाल करण्यात येत आहे.

मुंबईमध्ये एका तासात ५० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडल्यानंतर पाण्याचा झटपट निचरा व्हावा या दृष्टीने पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे बळकट करण्यात आले आहे. ५० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडल्यानंतर सखल भागात साचणाऱ्या पाण्याचा झटपट निचरा करता यावा यासाठी आठ ठिकाणी मोठे, तर चार ठिकाणी लहान उदंचन केंद्रे उभारण्याची शिफारस ब्रिमस्टोवॅड प्रकल्पात करण्यात आली होती. मात्र पालिकेने हाजी अली, लव्हग्रोव, क्लिव्हलॅण्ड, गझधरबांध, ईर्ला, ब्रिटानिया, मोगरा आणि माहुल या आठ ठिकाणी मोठी उदंचन केंद्रे उभारण्यावर लक्ष केंद्रित केले. मोगरा आणि माहुल वगळता अन्य सहा ठिकाणची उदंचन केंद्रे उभारून ती कार्यान्वित करण्यात पालिका यशस्वी झाली. मात्र मोगरा आणि माहुल येथे उदंचन केंद्रासाठी जागा मिळविण्याची खटपट आजही सुरू आहे. उर्वरित चार लहान उदंचन केंद्रे उभारण्याचा पालिकेला विसर पडला आहे.

या उदंचन केंद्रांव्यतिरिक्त ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाअंतर्गत धारावी, गिरगाव चौपाटी, दादर आणि मंडाले येथे छोटी उदंचन केंद्रे उभारण्याची शिफारस करण्यात आली होती. ब्रिटानिया उदंचन केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर हिंदमाता परिसरातील साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा झटपट निचरा होईल, असा दावा पालिकेकडून करण्यात आला होता. मात्र हिंदमाता परिसर ब्रिटानिया उदंचन केंद्राच्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे हिंदमाता परिसराला मंगळवारी झटपट जलमुक्ती मिळू शकली नाही. दादर येथील लहान उदंचन केंद्र कार्यान्वित झाले असते तर हिंदमाता परिसरातील पाण्याचा निचरा करणे पालिकेला सहज शक्य झाले असते. धारावी आणि मंडाले येथील उदंचन केंद्रे उभारण्यात आली असती तर या परिसरातील नागरिकांना मंगळवारी फटका बसला नसता, असे पालिकेतून निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाअंतर्गत उदंचन केंद्रे उभारण्याबाबत करण्यात आलेल्या शिफारशींची पालिकेतील उच्चपदस्थांनी खिल्ली उडविली होती. उदंचन केंद्राचा फारसा उपयोग होणार नाही, असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते; परंतु कार्यान्वित झालेल्या सहा उदंचन केंद्रांमुळे सखल भागातील पाण्याचा निचरा करण्यात यश आले आणि दुसऱ्या दिवशी मुंबई उभी राहिली. उदंचन केंद्राच्या उभारणीसाठी जागा मिळविणे हा जटिल प्रश्न आहे; पण सरकारी यंत्रणा अथवा खासगी मालकांनी सामाजिक बांधिलकीने मुंबईकरांच्या हितासाठी उदंचन केंद्राकरिता जागा देणे गरजेचे आहे. धारावी, गिरगाव चौपाटी, दादर आणि मंडाले येथील लहान उदंचन केंद्रे उभी राहिली तर अस्मानी संकटाच्या वेळी मुंबईला जलमुक्ती देण्यासाठी हातभार लागू शकेल. त्यामुळे पालिकेने आता या उदंचन केंद्रांचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे या निवृत्त अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

 

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-09-2017 at 02:02 IST
ताज्या बातम्या