मुंबई : गृहनिर्माण सोसायट्या, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, व्यावसायिक संकुले यांनी आपल्या आवारातच ओल्या कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करावी याकरीता मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केले आहेत. यापूर्वी ही योजना बारगळल्यानंतर आता या आस्थापनांना कचरा विल्हेवाटीसाठी मदत करण्याकरीता मुंबई महानगरपालिकेने त्रयस्थ संस्था नेमण्याचे ठरवले आहे. आपल्याच आवारात कचरा विल्हेवाट करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता करात १५ टक्के सवलत देण्याची घोषणाही पुन्हा करण्यात आली आहे.
मुंबईत दररोज सात हजार मेट्रीक टन कचरा गोळा केला जातो. हा कचरा कांजूरमार्ग आणि देवनार येथील कचराभूमीवर टाकला जातो. मात्र या कचराभूमीची क्षमता संपत चालली आहे. त्यामुळे काही पाच वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्या, हॉटेल आदी आस्थापनांना आपल्याच आवारात ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आवाहन केले होते. त्याकरीता तंत्रज्ञान विकसित करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. या बदल्यात मालमत्ता करात सवलत देण्याचेही आश्वासन दिले होते. मात्र मोजक्या संस्थांनीच या योजनेला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे पालिकेची ही योजना बारगळली होती. अनेक संस्था आपला कचरा त्रयस्थ संस्थांमार्फत उचलून इतरत्र टाकत होत्या.
मुंबई महापालिकेने अखेर गेल्यावर्षी ही योजना गुंडाळली
आता मात्र मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा हीच योजना आणली असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा निर्मिती करणाऱ्या संस्थांना कचरा विल्हेवाटीचे तंत्रज्ञान देण्यासाठी मदत केली जाणार आहे. गृहनिर्माण संस्था व इतर आस्थापनांना मदत करण्यासाठी महानगरपालिकेने त्रयस्थ संस्थांकडून स्वारस्य पत्रे मागवली आहेत. निवडलेल्या संस्था गृहनिर्माण संस्थांना मदत करणार आहेत. जागेचे तांत्रिक सर्वेक्षण, योग्य तंत्रज्ञानाची निवड, प्रकल्पाची उभारणी, संचालन व देखभाल, प्रशिक्षण व जनजागृती, कायदेशीर अनुपालन, सुका कचरा अधिकृत पुनर्प्रक्रिया संस्थांकडे सुपूर्द करणे या बाबींची मदत केली जाणार आहे.
दरम्यान, या उपक्रमामुळे कचरा वाहतुकीत घट होईल, कचराभूमीवर ताण कमी होईल, पुनर्वापराला चालना मिळेल, सोसायटीमध्येच खत निर्मिती, हरितगृह वायू उत्सर्जनात घट होईल असा विश्वास पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईची सद्यस्थिती शंभर किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापना..(बल्क वेस्ट जनरेटर) -३,१७७
५१३ संस्थांकडे कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध
गृहनिर्माण संस्थांसाठी विशेष प्रोत्साहन ज्या गृहनिर्माण संस्था ओल्या कचऱ्यावर जागेवर प्रक्रिया करतील व महानगरपालिकेच्या निकषांचे पालन करतील, त्यांना १५% पर्यंत मालमत्ता करात सवलत देण्यात येणार आहे.
