मुंबई महापालिकेकडून ‘जागरूक पालक-सुदृढ बालक’ विशेष अभियान
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘जागरूक पालक-सुदृढ बालक’ हे विशेष अभियान ९ फेब्रुवारी २०२३ पासून राबविण्यात येणार आहे. त्यात २४ लाख मुला-मुलींची आरोग्य तपासणी केली जाईल.
राज्यातील सर्व (ग्रामीण, शहरी व मनपा विभाग) ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी, संदर्भसेवा, प्रयोगशाळा तपासण्या व आवश्यकतेनुसार उपचार तथा शस्त्रक्रिया करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागातंर्गत ९ फेब्रुवारी २०२३ पासून ‘जागरूक पालक-सुदृढ बालक’ विशेष अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, शिक्षण विभाग व समाजकल्याण विभाग यांच्या समन्वयाने सदर अभियान राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ‘जागरूक पालक-सुदृढ बालक’ अभियान यशस्वी होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे, प्रत्येक बालकापर्यंत अभियानाचा लाभ पोहोचवावा, असे आर्देश अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी यावेळी दिले.
हेही वाचा >>> वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्गाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा; खारफुटी तोडण्यास एनएचएआयला उच्च न्यायालयाची परवानगी
या अभियान अंतर्गत ० ते १८ वयोगटाच्या बालकांना व मुला-मुलींना समुपदेशन, उपचार व मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय वैद्यकीय संघटना, इंडियन असोसिएशन ऑफ बालरोगतज्ज्ञ, खासगी डॉक्टर, अशासकीय संस्था यांनी या अभियानात जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.
या ठिकाणी होणार तपासणी
मुंबई शहर व उपनगर विभागातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, दिव्यांग शाळा, अंधशाळा, अंगणवाड्या, बालगृहे, बालसुधारगृहे, अनाथालये, समाज कल्याण व आदिवासी विभाग, वसतिगृहे (मुले/मुली), खासगी नर्सरी, बालवाड्या, खासगी शाळा व खासगी कनिष्ठ महाविद्यालये, तसेच शाळाबाह्य विद्यार्थी अशा ० ते १८ वर्षापर्यंतच्या साधारण २४ लाख मुला-मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे, असे संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले आहे.
अभियानाची उद्दिष्टे:-
राज्यातील १८ वर्षावरील सर्व मुला-मुलींची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे.
आजारी बालकांवर त्वरित उपचार करणे.
सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे.