अंधेरीच्या गोखले पूलाचे काम सुरू असल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात अंधेरी सबवे या पर्यायी मार्गाची कसोटी लागणार आहे. पाणी तुंबण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या मार्गावर मोठ्या क्षमतेचे सहा पंप बसवण्यात येणार आहेत. अंधेरी पूर्व आणि पश्चिम जोडणारा गोखले पूल नोव्हेंबरमध्ये बंद करण्यात आल्यामुळे अंधेरी परिसरातील नागरिकांना कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपूल आणि अंधेरी सबवे हे दोनच पर्यायी मार्ग आहेत. त्यातही अंधेरी सबवे हा स्थानकाच्याजवळ असल्यामुळे दुचाकीस्वार हा मार्ग निवडतात. तर पादचाऱ्यांना देखील हा मार्ग सोयीचा आहे.
हेही वाचा >>> भाईंदर: धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमासाठी आदल्या दिवसापासूनच भाविकांची गर्दी
मात्र पावसाळ्यात अंधेरी सबवेमध्ये खूप पाणी साचते व मार्ग बंद करावा लागतो. यावर्षी गोखले पूल बंद असल्यामुळे अंधेरी सबवेवर ताण आहे. गोखले पुलाची एक बाजू पावसाळ्यापूर्वी सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. मात्र तरीही अंधेरी सबवे या पर्यायी मार्गाची यंदा कसोटी आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी खुला व सुरक्षित राहील याची काळजी प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. पावसाळा तोंडावर आला असल्यामुळे पालिका प्रशासनाने अंधेरी सबवेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या सबवेमध्ये मोठ्या क्षमतेचे सहा पंप बसवण्यात येणार आहे. त्याकरिता प्रशासनाने नुकत्याच निविदा मागवल्या आहेत.