मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार सोमवार, २९ जुलैपासून मुंबईकरांवरील १० टक्के पाणी कपात मागे घेण्यात येणार आहे. ठाणे शहर, भिवंडी व नगरबाह्य विभागातील ग्रामपंचायतींना मुंबई महापालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील १० टक्के कपातही मागे घेण्यात येईल. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात सध्या ७३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. यंदा जून संपत आला तरी पावसाने पाठ फिरवल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा घटला होता. त्यामुळे पर्जन्यवृष्टीत सुधारणा होईपर्यंत पालिका प्रशासनातर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात ३० मेपासून ५ टक्के, तर ५ जूनपासून १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच, ठाणे शहर, भिवंडी व नगरबाह्य विभागातील ग्रामपंचायतींना मुंबई महापालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यातही कपात लागू करण्यात आली होती. परंतु जुलैमध्ये आतापर्यंत कोसळलेल्या पावसामुळे सातही धरणांतील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. हेही वाचा >>> भरधाव वेगाचा आणखी एक बळी; वरळीत आलिशान मोटरगाडीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू मुंबईकरांना पुढील २६४ दिवस म्हणजेच मार्च २०२५ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये उपलब्ध झाला आहे. सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर इतकी आहे. त्यातुलनेत सध्या सात धरणांत १० लाख ५६ हजार १५७ दशलक्ष लीटर पाणीसाठा जमा झाला आहे. सात धरणांपैकी तुळशी, तानसा, विहार, मोडकसागर जलाशय कठोकाठ भरले आहेत. तर सर्वांत मोठे भातसा धरणही ७० टक्क्याहून अधिक भरले आहे. त्यामुळे पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे चार जलाशये काठोकाठ ●मुंबईत पावसाने रविवारी विश्रांती घेतली. धरणक्षेत्रातही तुरळक पाऊस झाला. उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांतील पाणीसाठा रविवारी पहाटे ७२.९७ टक्के झाला होता. ●सात पैकी चार जलाशये काठोकाठ भरली आहेत. मुंबईच्या हद्दीतील विहार, तुळशी या जलाशयांबरोबरच तानसा आणि मोडकसागर धरणही भरल्यामुळे १० टक्के पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ●पाणी कपात रद्द केल्याने पाणी वितरण व्यवस्थेच्या टोकाच्या वस्त्या, गृहनिर्माण संस्था आदी ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. तसेच पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.