मुंबई महापालिकेवर चिता कॅम्प परिसरातून विजयी झालेल्या अपक्ष नगरसेविका हनिफाबी शेख यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या ६६ वर्षांच्या होत्या. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३५ मधून ८८०८ मताधिक्याने हनिफाबी शेख विजयी झाल्या होत्या. माजी नगरसेवक फारुख शेख यांच्या त्या मातोश्री होत. हृदय विकाराचा त्रास होत असल्यामुळे त्यांना मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मनोज संसारेंचे पद धोक्यात
हनिफाबी शेख यांच्या पाठिंब्यामुळे अपक्ष नगरसेवक मनोज संसारे यांनी अपक्षांचा गट स्थापन करून गटनेतेपदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली होती. मात्र हनिफाबी शेख यांच्या निधनामुळे आता या गटामध्ये संसारे एकटेचउरले आहेत. त्यामुळे त्यांचे गटनेतेपद धोक्यात आले आहे.
दरम्यान, या संदर्भात चिटणीस विभागापुढेही पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे कोकण भवनातून याबाबत माहिती मागविण्याचा निर्णय चिटणीस विभागाने घेतला आहे. तसेच संसारे यांचे गटनेतेपद कायम ठेवायचे की नाही याबाबत गटनेत्यांच्या बैठकीत महापौर सुनील प्रभू निर्णय घेण्याची शक्यता आहे.