मुंबई : दोन वर्षांपूर्वी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमधील रुग्णांना कोणतेही औषध खरेदी करावे लागू नये यासाठी ‘शून्य औषधचिठ्ठी’ ही योजना राबविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार गतवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये दरसूची अंतिम करून तिची लवकरच अमलबजावणी करण्यात येणार असल्याचे अर्थसंकल्पामध्ये स्पष्ट केले होते. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही तरतूद न केल्याने मुंबई महानगरपालिकेला या योजनेचा विसर पडल्याचे निदर्शनास येत आहे. यातून ‘शून्य औषधचिठ्ठी’ हा उपक्रम राबविण्यास मुंबई महानगरपालिका अपयशी ठरत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सर्वप्रकारची औषधे मोफत उपलब्ध व्हावी. खासगी औषध दुकानामधून रुग्णांना कोणतेही औषध खरेदी करावे लागू नये यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये ‘शून्य औषधचिठ्ठी’ योजना राबविण्याची घोषणा केली होती.

त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याकडून अनुसूचीवरील व अनुसूचीवर नसलेल्या औषधांची यादी तयार करून ती औषधे खरेदी करण्याची घोषणा केली. त्यासाठी गतवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये पुढील दोन वर्षांसाठी दरसूची अंतिम करून औषधे खरेदी करण्याबाबत निविदा राबविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. ही निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन वर्षभराच्या आत ‘शून्य औषधचिठ्ठी’ योजना राबविण्यात येणार असल्याचेही अर्थसंकल्पामध्ये स्पष्ट करण्यात आले होते.

आरोग्य विभागासाठी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये यंदा मुंबई महानगरपालिकेने २२.१४ टक्क्यांनी वाढ केली आहे. रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी मध्यवर्ती खरेदी कक्षामार्फत अनुसूचीवरील ९७९ बाबींसाठी दरपत्रक काढण्यात आले, तर १९८ बाबींसाठी दरपत्रक काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच दारिद्र्य रेषेखालील आणि दुर्बल घटकातील रुग्णांना तातडीने लागणारी औषधे गरीब रुग्ण सहाय्यता निधीतून उपलब्ध करण्यात येत असल्याचे मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केले.

मात्र सर्वसामान्य नागरिकांवरील औषधाच्या खर्चाचा भार कमी करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘शून्य औषधचिठ्ठी’ या योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये मुंबई महानगरपालिकेकडून कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. यामुळे तत्कालिन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचे मुंबई महानगरपालिकेला विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. ‘शून्य औषधचिठ्ठी’ या योजनेमुळे मुंबईतील रुग्णांवरील आर्थिक भार कमी होऊन त्यांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिकांचे याकडे लक्ष लागले आहे.