मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याबाबत धोरण आणण्याचे ठरवले आहे. मात्र या बदल्या करताना प्रत्येक अभियंत्याला किमान तीन ते पाच प्राधान्यक्रम देण्याची सुविधा असावी, तसेच एकाच पदावर दीर्घकाळ कार्यरत असलेल्या अभियंत्यांच्या बदल्यांना प्राधान्य द्यावे अशा सूचना अभियंत्यांच्या संघटनेने केल्या आहेत.
अभियंत्यांच्या प्रस्तावित ऑनलाइन बदली धोरणात पारदर्शक, न्याय्य आणि गुणवत्ता आधारित निकषांचा समावेश करण्याची मागणी म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन मुंबई या संघटनेने महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे. संघटनेने ५ ऑगस्ट रोजी पाठविलेल्या पत्रात ऑनलाइन बदली प्रक्रियेला तत्त्वतः समर्थन देत १४ महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या आहेत. पालिकेने अभियंत्यांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतल्यानंतर संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, अंतिम धोरण जाहीर करण्यापूर्वी नियमावली, गुणवत्तांकन पद्धती आणि अंमलबजावणी प्रक्रिया स्पष्ट करण्याची गरज असल्याचे पत्रात नमूद केले आहे. संघटनेने प्रत्येक अभियंत्याला किमान तीन ते पाच प्राधान्यक्रम (चॉईस) देण्याची सुविधा, सेवाज्येष्ठता, कार्यकाळ, गुणवत्ता, अनुभव आणि कार्यक्षमतेवर आधारित गुणांकन प्रणाली, तसेच सर्व रिक्त पदांची विभागनिहाय ऑनलाइन प्रसिद्धी करण्याची मागणी केली आहे.
अभियंता पती पत्नीचाही विचार व्हावा
एकाच पदावर दीर्घकाळ कार्यरत असलेल्या अभियंत्यांच्या बदल्यांना प्राधान्य देणे, पती-पत्नी दोघेही पालिका सेवेत असल्यास त्यांना जवळच्या कार्यक्षेत्रात नियुक्ती देणे, तसेच दिव्यांग, गंभीर आजाराने ग्रस्त आणि विशेष कौटुंबिक परिस्थिती असलेल्या अभियंत्यांसाठी स्वतंत्र प्राधान्य निकष ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.
अंतिम गुणवत्ता यादी, गुणांकन आणि बदली आदेश ऑनलाइन उपलब्ध करून द्यावे, अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी निश्चित कालावधी द्यावा आणि बदली आदेशाविरोधात ऑनलाइन हरकत किंवा अपीलची सुविधा उपलब्ध करण्याचीही मागणी केली आहे.
मानवी हस्तक्षेप टाळावा – मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी संपूर्ण बदली प्रक्रिया संगणकीकृत, नियमबद्ध आणि पडताळणीयोग्य असावी, तसेच धोरण अंतिम करण्यापूर्वी मान्यताप्राप्त अभियंता संघटनांशी सविस्तर चर्चा करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
- विशेष म्हणजे, पालिकेच्या नगरबाह्य विभागात कार्यरत अभियंत्यांना बदली प्रक्रियेत अतिरिक्त १५ गुण देण्याची किंवा स्वतंत्र विशेष प्राधान्य कोटा लागू करण्याची मागणीही संघटनेने केली आहे. त्यामुळे अनुभवी अभियंत्यांना प्रोत्साहन मिळून महत्त्वाच्या प्रकल्पांच्या सातत्यपूर्ण अंमलबजावणीला मदत होईल, असा दावा संघटनेने केला आहे.
- पालिकेने अभियंत्यांच्या बदल्यांसाठी सॉफ्टवेअर-आधारित ऑनलाइन प्रणाली विकसित करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, यापूर्वी बदल्यांतील कथित अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर ही सुधारणा महत्त्वाची मानली जात आहे.
