बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे (बीएनएचएस) देण्यात येणारे निसर्गसंवर्धनाचे पुरस्कार जाहीर झाले असून ‘निसर्गसंवर्धनाचा सलीम अली पुरस्कार’ (सलीम अली अॅवॉर्ड फॉर नेचर कॉन्झर्वेशन’) हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांना, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार अलेक्झांडर लुईस पील यांना देण्यात येणार आहे.
पक्षीशास्त्रात पायाभूत काम करणाऱ्या डॉ. सलीम अली यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘बीएनएचएस’तर्फे १९९६ पासून हे पुरस्कार देण्यात येतात. वन्यजीव संशोधन, संवर्धन आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. ‘बीएनएचएस’तर्फे पाणथळ जागा आणि स्थलांतरित पाणपक्षी या विषयावर आयोजित केलेल्या परिषदेत २२ नोव्हेंबरला हे पुरस्कार प्रदान केले जातील. मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अलेक्झांडर पील हे गेल्या दशकापासून लायबेरिया देशातील जैवविविधता आणि वारसा यांचे रक्षण आणि जतन करण्यामध्ये सक्रिय आहेत. लायबेरियाच्या फुटबॉल संघाचे प्रसिद्ध गोलरक्षक राहिलेले पील यांनी आपली सामाजिक प्रतिमा निसर्गसंवर्धनासाठी वापरून देशातील पहिले ‘सापो राष्ट्रीय उद्यान’ आणि ‘सोसायटी फॉर द कॉन्झर्वेशन ऑफ नेचर ऑफ लायबेरिया’ (रउठछ) या देशातील पहिल्या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली.
पर्यावरणसंवर्धनाचा सामुदायिक पुरस्कार नागालॅण्डमधील त्सुसेकी आणि लिंथुरे यांना जाहीर झाला आहे. या दोघांनी नागालॅण्डसारख्या दुर्गम ठिकाणी ‘भूतान ग्लोरी इको क्लब’ची स्थापना करून संस्थेच्या माध्यमातून सामुदायिक जमिनीवर वृक्षलागवड मोहीमा राबविल्या.
या वर्षांपासून ‘जे. सी. डॅनिअल कॉन्झर्वेशन लीडर अॅवॉर्ड फॉर यंग मेन आणि वुमेन’ या नावाने तरुणांना ‘बीएनएचएस’तर्फे पुरस्कार देण्यात येणार आहे. अनंत पांडे आणि सोनाली गर्ग जे. सी. डॅनियल पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत. अनंत पांडे गेली दहा वर्षे समुद्री पक्षी परिस्थितीशास्त्र, ध्रुवीय परिस्थितीशास्त्र या विषयावर काम केले आहे. सोनाली गर्ग यांनी पश्चिम घाट आणि श्रीलंकेतील बेडकांवर संशोधन केले आहे.
पश्चिम घाट अभ्यास समितीचे अध्यक्ष
ल्ल पर्यावरणाचे राष्ट्रीय धोरण तयार करण्यात सक्रिय भूमिका बजावणारे प्रा. माधव गाडगीळ हे गेली ५० वर्षे पर्यावरण क्षेत्रात कार्यरत आहेत. चिकित्सक, अभ्यासू आणि सतत कार्यरत अशा माधव गाडगीळ यांनी देशातील अनेक पर्यावरण चळवळींमध्येदेखील सक्रिय सहभाग घेतला आहे. पश्चिम घाट परिसंस्था विज्ञानतज्ज्ञांच्या अभ्यास समितीचे ते अध्यक्ष आहेत. पश्चिम घाटातील पर्यावरणाच्या ऱ्हासावर त्यांनी सडेतोड भूमिका मांडली आहे.
